जळगावात वाळू तस्करांचा महसूल विभागाच्या पथकावर हल्ला, गावठी बंदुकीने धमकावले
जळगाव, 8 डिसेंबर (हिं.स.) जळगाव जिल्ह्यात वाळू तस्करांची मुजोरी वाढली असून अशातच अमळनेर तालुक्यात कारवाईसाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकावर वाळू माफियांनी हल्ला करून गावठी बंदुकीने धमकावण्याचा प्रयत्न केला यांनतर जेसीबी व वाहने पळवून नेले. ही घटन
जळगावात वाळू तस्करांचा महसूल विभागाच्या पथकावर हल्ला, गावठी बंदुकीने धमकावले


जळगाव, 8 डिसेंबर (हिं.स.) जळगाव जिल्ह्यात वाळू तस्करांची मुजोरी वाढली असून अशातच अमळनेर तालुक्यात कारवाईसाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकावर वाळू माफियांनी हल्ला करून गावठी बंदुकीने धमकावण्याचा प्रयत्न केला यांनतर जेसीबी व वाहने पळवून नेले. ही घटना मांडळ शिवारातील पांझरा नदीत घडली. याप्रकरणी मंडळ अधिकारी पुरुषोत्तम पाटील यांच्या फिर्यादीवरून मारवड पोलीस ठाण्यात दहा ते पंधरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यात वाळू तस्करांनी मोठ्या प्रमाणावर हैदोस घातल्याचे चित्र दिसून येत असून यावर पोलीस आणि महसूल विभागाकडून अधूनमधून कारवाई होत असली तरी वाळू तस्करीवर कायमस्वरूपी नियंत्रण आणण्यात प्रशासनाला अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे गिरणा, तापी, बोरी, पांझरा आणि इतर बऱ्याच नद्यांमधील अवैध वाळू उपसा बिनबोभाटपणे सुरूच आहे.

अमळनेर तालुक्यातील मांडळ शिवारात पांझरा नदीच्या पात्रात अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल पथकावरही रविवारी माफियांनी हल्ला केल्याची घटना घडली. अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांनी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना तातडीने कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार मंडळाधिकारी पुरुषोत्तम पाटील, ग्राममहसूल अधिकारी संदीप माळी, जितेंद्र पाटील, मधुकर पाटील, पवनकुमार शिंगारे आणि दीपक पाटील यांचे पथक पांझरा नदीच्या काठी पोहोचले. त्या ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने दोन ट्रॅक्टरमध्ये वाळू भरली जात असल्याचे महसूल पथकाच्या पाहण्यात आले. त्यांनी चालकांकडे परवान्याची विचारणा करून वाहने तहसील कार्यालयात जमा करण्यास सांगितले. या दरम्यान, अचानक पाच ते सहा जण दुचाकीवरून आले आणि त्यांनी महसूल विभागाच्या पथकाला धमकावले. त्यांच्यात नंतर दहा-बारा जण लाठ्या-काठ्यांसह सामील झाले. हल्लेखोरांनी आधी महसूल अधिकाऱ्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. एका संशयिताने महसूल अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या डोळ्यात मिरचीची स्प्रे मारला, तर दुसऱ्याने त्यांच्या पायावर काठीचा प्रहार केला. आणखी एका हल्लेखोराने मंडळाधिकारी पुरुषोत्तम पाटील यांच्या कपाळावर गावठी बंदूक लावून जीवे मारण्याची धमकी दिली. हल्ल्यानंतर सर्व वाळू माफियांनी एकत्र येत जेसीबी व दोन्ही ट्रॅक्टर पळवून नेले. या प्रकरणी पुरुषोत्तम पाटील यांनी मारवड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, अज्ञात १० ते १५ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेचा महसूल अधिकारी आणि कर्मचारी संघटनेने तीव्र निषेध नोंदवला आहे. तसेच दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande