जळगावमध्ये १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह
जळगाव, 9 डिसेंबर (हिं.स.) | जिल्ह्यातील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह करण्यात आल्याची घटना ती गर्भवती राहून बाळाला जन्म दिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुलीच्या पतीसह ति
जळगावमध्ये १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह


जळगाव, 9 डिसेंबर (हिं.स.) | जिल्ह्यातील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह करण्यात आल्याची घटना ती गर्भवती राहून बाळाला जन्म दिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुलीच्या पतीसह तिचे आई-वडील, सासू-सासरे आणि लग्न लावून देणाऱ्या नातेवाईकांसह एकूण १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मुलीच्या पतीला पोलिसांनी अटक केली आहे.

अल्पवयीन मुलगी प्रसूतीसाठी जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल झाली होती. प्रसूती झाल्यानंतर तिचे वय केवळ १७ वर्षे असल्याचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. रक्षा रोकडे यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ ही माहिती तालुका पोलिसांना कळवली. सूचना मिळताच पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विजय पाटील व देविदास चिंचोरे यांनी तातडीने तपास सुरू केला. रुग्णालयातील कागदपत्रांसह पीडित मुलगी शिकत असलेल्या शाळेतून मिळवलेल्या जन्मदाखल्यावरून ती अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले.

चौकशीत उघड झाले की, १५ मार्च २०२४ रोजी पीडित मुलीचा विवाह चोपडा तालुक्यातील एका तरुणासोबत तिच्या कुटुंबियांनी लावून दिला होता. कायद्यानुसार मुलीचे किमान वय १८ वर्षे असणे आवश्‍यक असल्याने हा विवाह पूर्णपणे बेकायदेशीर ठरतो. विवाहानंतर ती गर्भवती राहिली आणि नुकताच तिने बाळाला जन्म दिला. या गंभीर प्रकरणी पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन संबंधित आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande