
अकोला, 9 डिसेंबर (हिं.स.): गेल्या 13 वर्षांपासून रखडलेला नरनाळा महोत्सव यंदा पुन्हा सुरू होत आहे. महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मोठी तयारी हाती घेतली असताना शहानूर–पोपटखेड या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामावर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
लाखोंचा निधी मंजूर असतानाही या रस्त्यावर निकृष्ट दर्जाचे काम सुरू असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. डांबराऐवजी गिट्टी–चुरी टाकून तात्पुरत्या पद्धतीने काम सुरू असल्याचे दिसत आहे. कामाच्या ठिकाणी ना कोणतेही अधिकारी, ना ठेकेदार उपस्थित असल्याने मोजणी, गुणवत्ता तपासणीचा पूर्ण अभाव जाणवत आहे. फक्त मोठे दगड टाकून वरून डांबर टाकण्याची घाई केली जात असल्याने हा रस्ता कायमस्वरूपी आहे की फक्त महोत्सवापुरता तात्पुरता, असा मोठा प्रश्न स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
रस्त्यावरील धूळ, गिट्टी आणि अपूर्ण कामामुळे वाहनचालकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. “खर्च प्रचंड, पण गुणवत्ता शून्य,” अशी नागरिकांची नाराजी असून त्यांनी या रस्त्याच्या कामाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. नरनाळा महोत्सव यशस्वी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून तयारी होत असली तरी लाखो रुपयांचा निधी वापरला जात असताना रस्ता मात्र निकृष्ट पद्धतीने तयार होत असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. हा रस्ता तात्पुरता आहे की कायमस्वरूपी, याची तपासणी करून आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.आदिवासी संस्कृती आणि निसर्गाच दर्शन या हेतूने हा महोत्सव साजरा करण्यात येत आहे मात्र हे दोन्ही हित जपत या ठिकाणी काम होणे तेवढेच गरजेचे सुद्धा आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे