
अकोला, 9 डिसेंबर (हिं.स.)।संपूर्ण विदर्भात नावाजलेली आणि प्रतिष्ठेची मानली जाणारी ‘विश्वास करंडक’ बाल नाट्य स्पर्धा यंदा 11 ते 13 डिसेंबर 2025 दरम्यान अकोल्यात आयोजित करण्यात आली आहे. स्थानिक प्रमिलाताई ओक हॉल येथे होणाऱ्या या तीन दिवसीय स्पर्धेत वऱ्हाड प्रांतातील अकोला, अमरावती, वाशिम, बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्यातील सुमारे 30 शाळांची 30 बालनाट्ये सादर होणार आहेत.
यापैकी जे. आर. डी. टाटा स्कूलच्या 4 नाटकांचे विशेष सादरीकरण होईल,मात्र ती स्पर्धेच्या गुणांकनात धरली जाणार नाहीत.स्पर्धा दररोज सकाळी 9 वाजता सुरू होणार असून प्रत्येक दिवशी 8 ते 10 नाटकांचे सादरीकरण होईल.उद्घाटन 11 डिसेंबर रोजी मागील वर्षी उत्कृष्ट कलावंत पुरस्कार पटकावणारे रुद्र जयदीप कुकडकर आणि अनया कुऱ्हे यांच्या हस्ते करण्यात येईल.नाट्य क्षेत्रातील तज्ज्ञ गिरीश फडके, धनंजय सरदेशपांडे आणि यतीन माझीरे परीक्षक म्हणून काम पाहणार आहेत.गेल्या 7 वर्षांपासून सुरू असलेल्या या स्पर्धेत 80 टक्के शाळांचा सातत्यपूर्ण सहभाग कायम असल्याचे आयोजकांनी सांगितले. विजेत्यांना फिरती ट्रॉफी आणि रोख रक्कम बक्षीस दिले जाणार आहे.आयोजकांनी सर्व रसिकांना ही स्पर्धा विनामूल्य असल्याचे सांगत उत्स्फूर्त प्रतिसाद देण्याचे आणि बालकलावंतांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे