
– गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचे विधानसभेत स्पष्टीकरण
नागपूर, 09 डिसेंबर (हिं.स.) : मुंबईच्या पवई परिसरात ऑडिशनच्या नावाखाली 7 ते 14 वर्षे वयोगटातील 20 मुलांना ओलीस ठेवून खळबळ उडवणाऱ्या रोहित आर्याचा पोलिस चकमकीत मृत्यू झाल्यानंतर याप्रकरणी विधानसभेत अनेक आमदारांनी लक्षवेधी उपस्थित केली. विजय वडेट्टीवार, नाना पटोले, विकास ठाकरे, अमिन पटेल, अस्लम शेख आणि डॉ. ज्योती गायकवाड यांनी एन्काउंटरवरील प्रश्न उपस्थित केले.
लक्षवेधीला उत्तर देताना गृहराज्यमंत्री पंकज भोयर म्हणाले की,“पोलिसांनी समयसूचकता दाखवत मुलांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी कारवाई केली. बॅलिस्टिक अहवालानुसार रोहित आर्याकडे असलेल्या शस्त्रात गोळ्या होत्या. त्यामुळे धोका टाळण्यासाठी त्याच्यावर गोळीबार करावा लागला.
वडेट्टीवार यांनी मात्र अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले—
कमरेखाली गोळी मारण्याचा नियम असताना थेट गोळीबार का ?
एन्काउंटरसाठी विशेषतः अधिकारी वाघमारे यांनाच का बोलावले ?
आर्याने ज्या मंत्र्यांची नावे घेतली, त्यांची चौकशी झाली का ?
आर्याची देयके सरकारकडे थकलेली होती का ?
असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले. त्याला उत्तर देताना गृहराज्यमंत्री भोयर यांनी पुढे सांगितले की,आर्य हा सल्लागार म्हणून कार्यरत होता. सीएसआर प्रकल्पांतर्गत त्याने दोन टप्प्यांचे काम पूर्ण केले असून 9.90 लाख रुपयांचे पेमेंट करण्यात आले आहे. मात्र, परवानगी नसताना शाळांकडून अतिरिक्त पैसे गोळा केल्याने त्याला नोटीस देण्यात आली होती. या प्रकरणात आतापर्यंत 115 जणांची चौकशी झाली आहे.
काँग्रेसचे नाना पटोले, शिवसेनेचे दिलीप लांडे यांनीही सरकारवर प्रशासनिक त्रुटीचे आरोप केले. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील म्हणाले की, ठेकेदाराचे पैसे थकण्याचा प्रश्न वेगळा, पण सल्लागाराचेही पैसे थकले हा प्रकार संशयास्पद आहे. सरकारने हे प्रकरण योग्यरीत्या हाताळले नाही. पाटील यांनी या घटनेची सखोल चौकशी करून अहवाल अधिवेशनात सादर करण्याची मागणी केली आहे.
-----------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी