
चिंचवड, 9 डिसेंबर (हिं.स.)औद्योगिक क्षेत्रात महत्त्वाचा ठरणारा ‘पुणे एक्स्पो’ १० ते १२ डिसेंबर दरम्यान चिंचवडमधील ऑटो क्लस्टर प्रदर्शन पार पडणार आहे. नवतंत्रज्ञानाचा अवलंब, निर्मितीक्षेत्राचा विस्तार आणि उद्योगातील विविध घटकांमधील परस्परसंबंध हा यंदाच्या प्रदर्शनाचा मुख्य हेतू राहणार आहे. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रिकल्चरतर्फे (एमसीसीआयए) आयोजित केल्या जाणाऱ्या या प्रदर्शनाची ही १४वी आवृत्ती असेल.तीन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात २०० हून अधिक कंपन्यांचा सहभाग असेल. यात इंजिनिअरिंग, मॅन्युफॅक्चरिंग, डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग, इलेक्ट्रिकल, पॉवर, ऑटोमेशन, आयटी आणि स्मार्ट सोल्यूशन्स, स्टार्टअप्स तसेच महिला संचलित उद्योग या संदर्भातील विशेष विभाग असतील. प्रदर्शनास विविध औद्योगिक श्रेणींतील उद्योजक, संबंधित कर्मचारी, स्टार्टअप्स, इंजिनिअरिंग-पॉलिटेक्निक महाविद्यालयांतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी भेट द्यावी, असे आवाहन ‘एमसीसीआय’ने केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु