
पुणे, 9 डिसेंबर, (हिं.स.)। ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांच्यावर वैकुंठ स्मशानभुमी, नवी पेठ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. शासनाच्यावतीने उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले; पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
यावेळी माजी गृहमंत्री मंत्री अनिल देशमुख, माजी राज्यमंत्री रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, चेतन तुपे, पोलीस उपायुक्त कृषिकेष रावल, उपविभागीय अधिकारी विठ्ठल जोशी, पुणे शहर तहसीलदार स्मिता माने, हवेली तहसीलदार अर्चना निकम यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
श्री. पवार म्हणाले, डॉ. बाबा आढाव यांनी खऱ्या अर्थाने कष्टकरी, श्रमिक, गरीब, वंचित आदी वर्गाकरिता संपूर्ण आयुष्य समर्पित केले. रिक्षा पंचायत, हमाल पंचायत, माथाडी, असंघटित कामगारांच्या प्रसंगात त्यांना कठोर भूमिका घ्यावी लागली. ते विचार घेऊन ते शेवटच्या श्वासापर्यंत आयुष्य जगले.
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा स्मरणात ठेवून त्यादृष्टीने वाटचाल केली, एक संघर्ष योद्धा म्हणून त्यांना भारतासह महाराष्ट्राने अनुभवले आहे, अशा शब्दात श्री. पवार यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यांनी बाबा आढाव यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. बाबा आढाव यांच्या पत्नी शीलाताई आढाव, मुलगा असीम आढाव, अंबर आढाव आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु