
नागपूर, 09 डिसेंबर (हिं.स.) : सातारा जिल्ह्याच्या फलटण येथीलउपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास न्यायाधीशामार्फत सुरू आहे. याप्रकरणी अटकेत असलेल्या दोघांशिवाय या प्रकरणात इतरांचा सहभाग आहे का, हे तपासले जात असल्याची माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत दिली.
या प्रकरणात पोलिस निरीक्षक गोपाल बदने आणि पोलीस प्रशांत बनकर यांना आधीच अटक केली आहे. डॉ. मुंडे यांच्या हातावर लिहिलेल्या सुसाइड नोटची हस्ताक्षर तज्ज्ञांनी पडताळणी केली असून ती त्यांच्या स्वतःच्या हस्ताक्षरातच असल्याचे स्पष्ट झाले. फडणवीस यांनी सांगितले की, “गोपाल बदने यांनी फसवणूक करून त्यांचे शारीरिक शोषण केल्याचे तपासात उघड झाले आहे.
त्वरित आरोपपत्र दाखल करण्याचा प्रयत्न
विधायक अमित साटम यांनी तपासाच्या गतीबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, महिला संबंधित प्रकरणांमध्ये 60 दिवसांत आरोपपत्र सादर करण्याचा प्रयत्न केला जातो. या प्रकरणातही आरोपपत्र लवकरच दाखल होईल. तपास महिला आयपीएस अधिकारी करत आहेत.
डिजिटल आणि फॉरेन्सिक पुरावे पोलिसांकडे
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी डॉ. मुंडे यांना ‘अनफिट’ प्रमाणपत्र देण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप केला. त्यावर फडणवीस म्हणाले की,या प्रकरणात सर्व डिजिटल आणि फॉरेन्सिक पुरावे उपलब्ध आहेत. डॉ. मुंडे आपल्या खोलीत जातानाचे सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांकडे आहे.
अनुकंपा नियुक्ती शक्य नाही, मात्र मदतीची तयारी
विधायक प्रकाश सोळंके यांनी कुटुंबातील व्यक्तीला अनुकंपा तत्त्वावर नोकरीची मागणी केली. त्यावर फडणवीस म्हणाले की, डॉ. मुंडे कंत्राटी पद्धतीवर 11 महिन्यांपासून काम करत होत्या. त्यामुळे अनुकंपा नियुक्ती शक्य नाही; मात्र सरकारकडून मदतीचे सर्व प्रयत्न केले जातील.
लाडकी बहिण योजनेला राजकारणात ओढू नका : मुख्यमंत्री
विधायक ज्योती गायकवाड यांनी महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्न विचारताना लाडकी बहिण योजनेवरही भाष्य केले. त्यांनी सुरक्षा 1500 रुपयांपेक्षा महत्त्वाची असल्याचे सांगितले.
यावर मुख्यमंत्री म्हणाले की चौकशी सर्व बाजूंनी पारदर्शकपणे सुरू आहे. काही जण प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रत्येक गोष्टीशी लाडकी बहिण योजना जोडणे योग्य नाही. राज्यातील अडीच कोटी बहिणी लाभ घेत आहेत. योजना सुरू राहील आणि महिला सुरक्षेलाही प्राधान्य दिले जाईल असेही त्यांनी सांगितले.
यावेळी विधायक सुनील प्रभू यांनी पुणे कोरेगाव येथील एका मुलीवर झालेल्या हल्ल्याबद्दल प्रश्न उपस्थित केला. त्यावरही गृहमंत्र्यांनी “चौकशी केली जाईल” असे सांगितले. तर नाना पटोले यांनी राज्यातील वाढत्या महिला अत्याचारांवर चिंता व्यक्त करून ‘शक्ती कायदा’ आणि ‘निराधार’ योजनेबाबत प्रश्न विचारला. यावर फडणवीस म्हणाले की, “निराधार योजनेचे कोणतेही पैसे रोखलेले नाहीत. केवायसी पूर्ण झाल्यानंतर उर्वरित पैसे महिन्याच्या 1 तारखेला जमा होतील. शक्ती कायदा संविधानाशी विसंगत असल्याने काही तरतुदींवर पुनर्विचार करण्यासाठी परत पाठवला गेला आहे. आवश्यक सुधारणा करून तो पुन्हा आणला जाईल असे त्यांनी सांगितले.
----------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी