
गडचिरोली., 9 डिसेंबर (हिं.स.) गडचिरोलीच्या विकासाला गती देण्यासाठी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने सुरू असलेल्या प्रयत्नांना ॲक्सिस बँक फाउंडेशनने पाठिंबा दिला आहे. बायफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशनच्या माध्यमातून गडचिरोली तालुक्यातील 49 गावांमध्ये 'एकात्मिक उपजीविका विकास' प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे.
1 जानेवारी 2025 पासून सुरू असलेल्या या 3 वर्षांच्या प्रकल्पासाठी सुमारे ₹20.34 कोटींचा भरीव निधी फाउंडेशनतर्फे उपलब्ध करण्यात आला आहे, यातून 5,000 कुटुंबांना थेट लाभ मिळणार आहे.
या उपक्रमाची सुरुवात प्रभावीपणे झाली असून, 30 जून 2025 पर्यंत 2,000 कुटुंबांची नोंदणी पूर्ण झाली होती. विशेष म्हणजे, पाणी व्यवस्थापनासाठी 66 नैसर्गिक शेततळ्यांमधील गाळ काढून त्यांची जलधारण क्षमता प्रचंड वाढविण्यात आली आहे. हा प्रकल्प नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन सुधारण्यावर आणि शाश्वत उपजीविकेच्या संधी निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करतो.
या प्रकल्पाचा आत्मा म्हणजे 'नैसर्गिक शेततळी-आधारित शेती प्रणाली'. ही पद्धत गडचिरोलीच्या भौगोलिक स्थितीसाठी वरदान ठरत आहे. यामध्ये जलसंधारण, मत्स्यपालन आणि कुक्कुटपालनाचे सुंदर एकत्रीकरण साधले जाते, ज्यामुळे एकात्मिक शेतीचा विकास होतो आणि कुटुंबांना एकाच वेळी विविध प्रकारची उत्पादने व उत्पन्न मिळते.
2027-28 पर्यंत, हा प्रकल्प 5,000 कुटुंबांचे केवळ उत्पन्न दुप्पट करणार नाही, तर सामूहिक खरेदी-विक्रीसाठी शेतकरी गट स्थापन करून आर्थिक सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणार आहे. यातून उत्तम पोषण आणि आरोग्यविषयक जागरूकता वाढवून, संपूर्ण समुदायाचे जीवनमान उंचावण्याचे भव्य स्वप्न साकारले जाणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Milind Khond