
( रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट आणि पर्यावरण दक्षता मंच यांचा उपक्रम)
डोंबिवली, 9 डिसेंबर (हिं.स.)। ५ डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय मृदादिन म्हणून साजरा करण्यात येतो. मृदा दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट तर्फे मातीवरील प्रयोगांचे प्रदर्शन व माती विषयक जागृतीचा कार्यक्रम, ३ डिसेंबर रोजी शहरातील विद्यार्थ्यांच्या उत्साहपूर्ण सहभागासह रोटरी भवन येथे पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन गुरुकुल – द डे स्कूलचे संस्थापक अजित करकरे यांच्या हस्ते व रोटरी क्लब ऑफ डोंबिवलीचे अध्यक्ष डॉ. संदीप घरत आणि मानद सचिव विनायक आगटे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी अध्यक्ष डॉ. संदीप घरत यांनी मृदादिन साजरा करण्याचे महत्त्व स्पष्ट केले आणि पर्यावरण संरक्षणासाठी क्लबची बांधिलकी अधोरेखित केली. पर्यावरण संवर्धन आणि शाश्वततेबाबत दृढ मूल्ये तरुण मनात रुजविण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली, जेणेकरून ते भविष्यात पृथ्वीचे जबाबदार संरक्षक बनू शकतील.
डॉ. संदीप घरत पुढे म्हणाले, पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या दैनंदिन जीवनात लहान पण अर्थपूर्ण पावले उचलली पाहिजेत. मोठे बदल लहान पाऊलांपासूनच सुरू होतात. प्रत्येकाने आपण स्वतः काय करू शकतो याचा विचार करावा असे त्यांनी आवाहन केले.
प्रदर्शनात मातीवरील विविध प्रयोग आणि माहितीपूर्ण सादरीकरणांचा समावेश होता. पवार पब्लिक स्कूलमधील विशेष प्रशिक्षित ४० विद्यार्थ्यांनी पर्यावरण दक्षता मंडळाच्या मार्गदर्शनाखाली हे प्रयोग सादर केले. शहरातील १५ शाळांमधील एकूण ७०० विद्यार्थ्यांनी, या प्रदर्शनाला भेट दिली. या प्रयोगांद्वारे , माती ही पर्यावरणीय परिसंस्थेची आत्मा असून, जगातील जवळपास ९०% अन्नसुरक्षा चांगल्या मातीवर अवलंबून असल्याची माहिती देण्यात आली. तसेच जागतिक पातळीवर जवळपास ३०% माती प्रदूषित होत असल्याचे सांगून पुढील पिढीसाठी सजगता आणि कृतीची गरज अधोरेखित करण्यात आली.
कार्यक्रमाचाच एक भाग म्हणून चिल्ड्रेन पार्कमध्ये तुळशी बाग आणि गुलाब कॉर्नरचे उद्घाटन करण्यात आले. शहरी भागात मातीशी असलेले नाते हरवू लागले असून हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी आणि नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचे अध्यक्ष डॉ. घरत यांनी सांगितले. शहरी भागात “सॉइल सीलिंग” म्हणजे मातीवरील सिमेंटचे वाढणारे आवरण व मातीची घुसमट हा मोठा प्रश्न असून जागरुकतेने हा प्रश्न कमी होऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
मृदादिन साजरा करण्याची कल्पना रोटेरियन विजय घोडेकर यांनी मांडली व पर्यावरण दक्षता मंडळाच्या रुपाली शाईवाले व त्यांचे सहकारी यांच्या सहकार्याने हा प्रकल्प यशस्वीरीत्या राबविण्यात आला. या कार्यक्रमाचे समन्वयन क्लबचे मानद सचिव विनायक आगटे, डायरेक्टर रो. धनश्री मोने, प्रोजेक्ट चेअरमन रो. राकेश मेहता, रो विजय सोनवणे व रो कमलाकर सावंत यांनी केले.
रो. चित्रा आगटे, चंद्रशेखर शिंदे, सतीश अटकेकर, दिलीप यावलकर, आरती बापट, सुनंदा जगताप आणि इतर स्वयंसेवकांनी संपूर्ण कार्यक्रमात उत्साहाने योगदान दिले. कार्यक्रमाचा समारोप पर्यावरण संरक्षणाचा मजबूत संदेश देत करण्यात आला, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नैसर्गिक संपत्ती संवर्धनाची प्रेरणा आणि जाणीव दृढ झाली.
हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi