
टोकियो , 9 डिसेंबर (हिं.स.)।उत्तरी जपानच्या किनाऱ्याजवळ सोमवारी उशिरा रात्री 7.5 तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपात 23 जण जखमी झाले. त्याशिवाय, प्रशांत महासागराच्या किनारी भागांमध्ये सुनामीची लाट आली. अधिकाऱ्यांनी नंतर आणखी मोठ्या धक्क्यांचा धोका असल्याचा इशारा दिला आहे. जपानी सरकार सध्या या सुनामीच्या लाटेमुळे आणि उशिरा रात्री झालेल्या भूकंपामुळे झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन करत आहे.
हा भूकंप रात्री सव्वा अकराच्या सुमारास प्रशांत महासागरात झाला. मुख्य होंशू बेटाच्या उत्तरेकडील भागातील आओमोरी किनाऱ्यापासून सुमारे 80 किलोमीटर अंतरावर हा भूकंप समुद्रात झाला.जपान हवामानशास्त्र एजन्सीने सांगितले की इवाते प्रांतात आणि आओमोरीच्या अगदी दक्षिणेला असलेल्या कुजी बंदरात सुमारे 70 सेंटीमीटर (२ फूट ४ इंच) उंचीची सुनामी लाट नोंदवली गेली. इतर किनारी भागांमध्ये ही लाट 50 सेंटीमीटरपर्यंत पोहोचली. अग्निशमन आणि आपत्ती व्यवस्थापन एजन्सीने सांगितले की 23 जण जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. माहितीनुसार बहुतेक लोक पडणाऱ्या वस्तूंच्या धडकेने जखमी झाले. हाचिनोहेमधील एका हॉटेलमध्ये अनेक लोक जखमी झाले आणि तोहोकूमध्ये एक व्यक्ती हलकी जखमी झाला, कारण त्याची कार एका खड्ड्यात कोसळली.
हवामान एजन्सीने भूकंपाची तीव्रता 7.5 नोंदवली, जी आधी अंदाजित 7.6 होती. एजन्सीने सुरुवातीला काही भागांमध्ये तीन मीटर (10 फूट) उंचीपर्यंत सुनामीची शक्यता असल्याचा इशारा दिला होता, परंतु नंतर ती सल्लामूलक सूचनामध्ये बदलण्यात आली. मुख्य कॅबिनेट सचिव मिन्नो किहारा यांनी नागरिकांना सल्ला दिला की सुचना मागे घेतली जाईपर्यंत ते उंच ठिकाणी किंवा सुरक्षित आश्रयस्थानी राहावेत. त्यांनी सांगितले की सुमारे 800 घरांत वीज नव्हती. शिंकान्सेन बुलेट ट्रेन आणि काही स्थानिक रेल्वे सेवा या प्रदेशातील काही भागांत थांबवण्यात आल्या होत्या.
किहारा यांनी सांगितले की या प्रदेशातील अणुउर्जा केंद्रे सुरक्षा तपासण्या करत आहेत. अणु नियमन प्राधिकरणाने सांगितले की आओमोरीमधील रोक्काशो इंधन- पुनर्प्रक्रिया केंद्रातील वापरलेल्या इंधनाला थंड करण्याच्या भागातून सुमारे 450 लिटर (118 गॅलन) पाण्याची गळती झाली, परंतु ते प्रमाण सामान्य मर्यादेतच होते आणि सुरक्षेची कोणतीही समस्या नव्हती. संरक्षण मंत्री शिंजिरो कोइझुमी यांनी सांगितले की सुमारे 480 रहिवाशांनी हाचिनोहे हवाई तळावर आश्रय घेतला असून नुकसानाचे मूल्यांकन करण्यासाठी सैन्याचे 18 हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले आहेत.
पंतप्रधान ताकाइची यांनी सांगितले की सुमारे 200 प्रवासी न्यू चितोसे विमानतळावर रात्रीभर अडकून पडले होते. पंतप्रधान साने ताकाइची यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की सरकारने तातडीने नुकसानाचे मूल्यांकन करण्यासाठी आपत्कालीन कार्यदल स्थापन केले आहे. त्यांनी सांगितले, “लोकांचे प्राण वाचवणे ही आमची प्राथमिकता आहे आणि आम्ही त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत.” नंतर त्यांनी या प्रदेशातील रहिवाशांना स्थानिक नगरपालिका देत असलेल्या ताज्या माहितीकडे लक्ष ठेवण्याचे आवाहन केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode