
नागपूर, 9 डिसेंबर (हिं.स.)। राज्याचे माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आज विधानसभेत राज्यातील इतर मागासवर्गीय (ओबीसी) विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी शासकीय वसतिगृह उभारणीचे उद्दिष्ट अपूर्ण राहिल्याबद्दल तारांकित प्रश्न उपस्थित केला. प्रत्येक जिल्ह्यात २०० विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारणीचे उद्दिष्ट असताना ते किती साध्य झाले, असा प्रश्न त्यांनी विचारला. यावर सामाजिक न्याय व विशेष साहाय्य मंत्री श्री. अतुल सावे यांनी, वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या ३६ जिल्ह्यातील २१,६०० पात्र ओबीसी विद्यार्थी-विद्यार्थिनींना त्यांच्या बँक खात्यात थेट निवास व भोजन खर्च भत्ता (DBT) वाटप करण्यात येत असल्याची माहिती दिली. तसेच, आमदार देशमुख यांच्या मागणीनुसार लवकरच वसतिगृह उभारणीचे आश्वासनही त्यांनी दिले.
राज्याचे माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आज (मंगळवार) विधानसभेत राज्यातील इतर मागासवर्गीय (ओबीसी) विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी शासकीय वसतिगृह उभारणीच्या अपूर्ण उद्दिष्टावर तारांकित प्रश्न उपस्थित केला. आमदार अमित देशमुख यांनी प्रश्न विचारला की, महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात १०० विद्यार्थी आणि १०० विद्यार्थिनींसाठी (एकूण २०० विद्यार्थी) शासकीय वसतिगृह उभारणीचे उद्दिष्ट असताना, आत्तापर्यंत हे उद्दिष्ट किती प्रमाणात साध्य झाले आहे?या उद्दिष्ट पूर्तीसाठी जेथे वस्तीगृहांचे बांधकाम झालेले नाही, तेथील पात्र विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना निवास व भोजन खर्च भत्ता देण्यात यावा, अशी आग्रही मागणीही त्यांनी तारांकित प्रश्नावरील चर्चेत सहभागी होताना केली.
आमदार देशमुख यांच्या उपप्रश्नाला उत्तर देताना सामाजिक न्याय व विशेष साहाय्य मंत्री श्री. अतुल सावे यांनी खालील माहिती दिली की, निवास भत्ता : प्रत्येक जिल्ह्यातील ६०० प्रमाणे ३६ जिल्ह्यातील एकूण २१,६०० विद्यार्थी विद्यार्थिनींना त्यांच्या आधार कार्डच्या आधारे त्यांच्या बँक खात्यात निवास आणि भोजन खर्च भत्ता वाटप करण्यात येत आहे. तसेच सन २०२४-२५ या वर्षात, २,८८९ विद्यार्थी विद्यार्थिनींना शासनाने या योजनेत सामावून घेतले. चालू वर्षात १,२०० विद्यार्थी विद्यार्थिनींची सोय वसतिगृहात करण्यात आली आहे. असे सांगून मंत्री सावे यांनी लवकरात लवकर प्रत्येक जिल्ह्यात वस्तीगृहाची उभारणी करून या विद्यार्थी विद्यार्थिनींना निवास, भोजन, ग्रंथालय, अभ्यासिका या सोयी-सुविधा पुरवल्या जातील, असे आश्वासन दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis