
बीजिंग, 9 डिसेंबर (हिं.स.)। रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्या अलीकडील भारत दौर्याबाबत चीनने सकारात्मक भूमिका घेतली असून म्हटले आहे की भारत-चीन-रशिया यांच्यातील मजबूत त्रिपक्षीय संबंध केवळ प्रादेशिकच नव्हे, तर जागतिक स्थैर्य आणि शांततेसाठीही अत्यंत महत्त्वाचे आहेत. चीनचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे, जेव्हा रशिया आणि चीन यांचे संबंध पूर्वीपेक्षा अधिक मजबूत आहेत आणि भारत-चीन संबंधही सामान्य स्थितीकडे वाटचाल करत आहेत.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गुओ जियाकुन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की चीन, भारत आणि रशिया या उदयोन्मुख अर्थव्यवस्था असून ‘ग्लोबल साउथ’चा महत्त्वाचा आवाज आहेत. त्यांनी म्हटले की या तीन देशांतील मजबूत आणि टिकाऊ सहकार्य केवळ त्यांच्या फायद्याचे ठरणार नाही, तर जागतिक सुरक्षा, विकास आणि समृद्धीतही मोलाचा वाटा उचलेल. गुओ म्हणाले, “त्रिपक्षीय सहकार्य मजबूत ठेवणे सर्व देशांच्या हिताचे आहे आणि ते आशिया तसेच संपूर्ण जगासाठी स्थैर्यदायी ठरेल.”
पूर्व लडाखमध्ये 2020 मध्ये निर्माण झालेल्या तणावानंतर थंडावलेल्या भारत-चीन संबंधांबाबतही चीनने सकारात्मक संकेत दिले आहेत. गुओ जियाकुन म्हणाले की बीजिंग दीर्घकालीन दृष्टीकोनातून भारतासोबतचे संबंध नैसर्गिक, स्थिर आणि मजबूत करण्यासाठी कटिबद्ध आहे. त्यांनी सांगितले, “आम्ही भारतासोबत मिळून हे संबंध रणनीतीपूर्वक आणि दीर्घकालीन दृष्टिकोनातून व्यवस्थापित करण्यास तयार आहोत, जेणेकरून दोन्ही देशांच्या नागरिकांना खरा लाभ मिळेल.”
बीजिंग रशिया-भारत या वाढत्या निकट संबंधांकडे लक्ष ठेऊन होता. भारत दौऱ्यापूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत पुतिन यांनी भारत आणि चीन हे रशियाचे सर्वात जवळचे मित्र असल्याचे म्हटले होते आणि दोन्ही देश आपले मतभेद स्वतः सोडवू शकतील, असा विश्वास व्यक्त केला होता. या विधानावर प्रतिक्रिया देताना चीनने सांगितले की तो रशिया आणि भारत दोघांसोबतही मजबूत द्विपक्षीय सहकार्य पुढे नेण्यास तयार आहे. चीनच्या सरकारी माध्यमांनी पुतिन यांच्या त्या विधानांना विशेष स्थान दिले, ज्यात त्यांनी भारताच्या रशियाकडून तेल खरेदीविषयीच्या अमेरिकन टीकेलाही फेटाळले होते.
राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन 4-5 डिसेंबर रोजी भारताच्या अधिकृत दौऱ्यावर आले होते. 2021 नंतरचा हा त्यांचा पहिला भारत दौरा होता. या दरम्यान व्यापार, संरक्षण, ऊर्जा आणि गुंतवणूक क्षेत्राशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. दोन्ही देशांनी 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 100 अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याचे लक्ष्य ठरवले आणि दीर्घकालीन आर्थिक सहकार्य कार्यक्रमालाही मंजुरी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode