
कोल्हापूर, 9 डिसेंबर, (हिं.स.)। जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, कोल्हापूर येथील वैद्यकीय बिलांबाबत माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांच्या अनुषंगाने चौकशी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या निर्देशानुसार चौकशी समितीची स्थापना करण्यात आली आहे.
शिवसेना उबाठा गटाचे उपनेते संजय पवार, विजय देवणे आणि कार्यकर्त्यांना जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात वैद्यकीय बिलांसाठी घेतलेल्या रकमेची नोंदवही सापडली. त्यातून वैद्यकीय देयेके पारित करण्यासाठी भ्रष्टाचार झाल्याचे मुद्दे माध्यमांमध्ये समोर आले आहेत. त्यामुळे आरोग्य खात्यातील भ्रष्टाचाराच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या.
या पार्श्वभूमीवर पालकमंत्री आबिटकर यांनी उपसंचालक, आरोग्य सेवा, कोल्हापूर मंडळ यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय चौकशी समिती नियुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत.
या समितीत उपसंचालक, आरोग्य सेवा, कोल्हापूर मंडळ (अध्यक्ष), सहायक संचालक, आरोग्य सेवा, कोल्हापूर (हिवताप), आणि जिल्हा शल्यचिकित्सक, सांगली यांचा समावेश आहे. उपसंचालक, आरोग्य सेवा, कोल्हापूर मंडळ यांनी कार्यालयीन आदेश जारी करून समितीची स्थापना केली आहे. ही समिती माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने सविस्तर चौकशी करून आपला अहवाल सादर करणार आहे.
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar