
नवी दिल्ली, 09 डिसेंबर (हिं.स.) : संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान राज्यसभेत ‘वंदे मातरम्’ विषयावर चर्चा झाली. यावेळी सभागृहातील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी भारतीय जनता पक्षावर (भाजपा) तीव्र टीका केली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचा संदर्भ देत सांगितले की, पूर्व पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर आरोप करण्यापूर्वी भाजपा नेत्यांनी इतिहास वाचला पाहिजे.
याप्रसंगी खरगे म्हणाले की, मी पंतप्रधान मोदींचे भाषण ऐकले. त्यांनी नेहरूजींवर आरोप केला की 1937 मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने ‘वंदे मातरम्’च्या मूळ गीतातील काही महत्त्वाच्या ओळी काढून टाकल्या. आज भाजपचे लोक अशा प्रकारचे आरोप करतात. पण जेव्हा तुमचे पूर्वज श्यामाप्रसाद मुखर्जी बंगालमध्ये मुस्लिम लीगसोबत मिळून सरकार चालवत होते, तेव्हा तुमची देशभक्ती कुठे होती ? भाजपने स्वतःचा इतिहास वाचायला हवा असे काँग्रेस अध्यक्ष म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुभाषचंद्र बोस यांच्याबाबत नेहरूजींच्या पत्राचा उल्लेख केला. नेहमीप्रमाणे त्यांनी सभागृहाची दिशाभूल केली. मोदींचे आरोप तथ्यांपासून खूप दूर आहेत व जनतेला गोंधळवणारे आहेत. खरी गोष्ट म्हणजे 16 ऑक्टोबर 1937 रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना पत्र लिहून विचारले होते की, काँग्रेसने ‘वंदे मातरम्’बाबत कोणती भूमिका घ्यावी ? त्याच्या दुसऱ्या दिवशी नेताजींनी नेहरूजींना पत्र लिहून या विषयावर गुरुदेवांशी प्रत्यक्ष भेटून चर्चा करण्याचा सल्ला दिल्याचे खरगे यांनी सांगितले.
---------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी