
-तरीही अनेक बहिणींना सुधारित नियमांचा पत्ता नाही
अमरावती, 9 डिसेंबर (हिं.स.) | लाडक्या बहिणींना ई-केवायसी प्रक्रिया करता यावी यासाठी राज्य शासनाने ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. तसेच ज्या लाभार्थींना पती किंवा वडिलांचे आधारकार्ड उपलब्ध नसल्यामुळे ई-केवायसी करता येत नव्हती, त्यांच्यासाठी सुधारित नियम जारी करून अंगणवाडीताईंना शिफारसपत्र देण्याचा अधिकार बहाल करण्यात आला आहे. या संदर्भात शासनाचा अध्यादेशही प्रसिद्ध झाला आहे.
मात्र या सुधारित नियमांची माहिती अनेक लाडक्या बहिणींना मिळालेलीच नाही. परिणामी सुधारित आदेशांची अंमलबजावणी गावपातळीवर पूर्ण क्षमतेने सुरूच होत नाही. अंगणवाडीताईंना दिलेला अधिकार व त्यासाठी ठरविलेली प्रक्रिया प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत न पोहोचल्याने अनेक महिलांची ई-केवायसी प्रक्रिया अर्धवट अडकून पडली आहे.
विधवा, परित्यक्ता किंवा पती-वडिलांचे निधन झालेल्या लाभार्थींना सर्वाधिक दिलासा देणारा हा सुधारित नियम असला, तरी त्याची माहिती न मिळाल्याने अनेक बहिणी अजूनही जुन्याच कागदपत्रांच्या शोधात भटकताना दिसत आहेत. काही ठिकाणी अंगणवाडी सेविकांच्याही अनभिज्ञतेमुळे लाभार्थींना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.
शासनाने केलेल्या बदलांचा फायदा सर्वांना मिळावा यासाठी नियमानुसार व्यापक जनजागृती गरजेची असून, गावपातळीवरील मार्गदर्शनाची व्यवस्था मजबूत करण्याची मागणी होत आहे. सुधारित नियमांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचल्यास लाडक्या बहिणींची ई-केवायसी प्रक्रिया सुलभ होऊन आर्थिक मदत वेळेत मिळू शकणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी