रायगड : नागावमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 5 जण जखमी
रायगड, 9 डिसेंबर (हिं.स.) : अलिबाग तालुक्यातील नागाव परिसरात बिबट्या दिसल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आज सकाळी नागाव येथील नागरी वस्तीलगत बिबट्याचे अचानक दर्शन झाल्याने परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. या घटनेत बिबट्याने
नागावमध्ये बिबट्याचा धुमाकूळ; वस्तीजवळ हल्ला, पाच जखमी


रायगड, 9 डिसेंबर (हिं.स.) : अलिबाग तालुक्यातील नागाव परिसरात बिबट्या दिसल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आज सकाळी नागाव येथील नागरी वस्तीलगत बिबट्याचे अचानक दर्शन झाल्याने परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. या घटनेत बिबट्याने प्रथम दोन नागरिकांवर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. त्यानंतर दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास सुरू असलेल्या बचाव मोहिमेदरम्यान रेस्क्यू टीममधील आणखी तिघांवर हल्ला होऊन तेही जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी तसेच पोलिस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील एका वाडीत बिबट्या लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला सुरक्षितपणे जेरबंद करण्यासाठी विशेष पथक तैनात करण्यात आले आहे. पिंजरे, ट्रॅप कॅमेरे आणि शांततादायक इंजेक्शनच्या सहाय्याने बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत.या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना घराबाहेर विनाकारण न पडण्याचे आणि लहान मुले तसेच वयोवृद्धांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच बिबट्याच्या उपस्थितीबाबत अफवा पसरवू नयेत व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.नागावच्या सरपंच हर्षदा मयेकर यांनीही ग्रामस्थांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून, वनविभागाच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे सांगितले आहे. वनविभाग आणि पोलिसांची संयुक्त मोहीम सुरू असून, परिस्थिती लवकरच नियंत्रणात येईल, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande