छ. शिवाजी महाराज टर्मिनल येथे महाराजांचा भव्य पुतळा उभारला जाणार - मुख्यमंत्री
नागपूर, 9 डिसेंबर (हिं.स.)। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा बसविण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. लोकसभेतील एका लेखी उत्तरात छत्रपती शिवाजी महाराज यां
CM Devendra Fadnavis


नागपूर, 9 डिसेंबर (हिं.स.)। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा बसविण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

लोकसभेतील एका लेखी उत्तरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या प्रस्तावाला नकार दर्शविल्याचा उल्लेख काही सदस्यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे उत्तर जुना आराखडा लक्षात घेऊन लोकसभेत देण्यात आल्याचे स्पष्ट केले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक हे आपले अभिमानाचे स्थान आहे. याठिकाणी पुतळा उभारण्याची मागणी पूर्वीही करण्यात आली होती. त्यावेळी या संदर्भातील आराखडा तयार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र अलीकडे लोकसभेत आलेले उत्तर हे जुन्या आराखड्याशी संबंधित असल्याचे केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी स्वतः स्पष्ट केले असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, नवीन आराखड्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्याचा प्रस्ताव असून त्याच्या अंतिम मंजुरीची प्रक्रिया सुरू आहे. नवीन आराखडा मंजूर झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकावर अत्यंत भव्य असा पुतळा उभारला जाणार आहे. लोकसभेत आलेले उत्तर हे केवळ जुन्या आराखड्यावर आधारित असल्याने गैरसमज निर्माण झाला असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande