
नागपूर, 9 डिसेंबर (हिं.स.)। शासकीय खरेदी केंद्रांवरील सोयाबीन खरेदीचे निकष गतवर्षीच्या तुलतेत यंदा अधिक कठोर झाल्याने सोयाबीन खरेदीत अडचणी येत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार असून, सदर निकष शिथिल करण्याची मागणी नांदेड जिल्ह्यातील भोकर विधानसभा मतदारसंघाच्या भाजप आमदार श्रीजया अशोकराव चव्हाण यांनी केली आहे.
मंगळवारी विधानसभेत बोलताना त्यांनी या प्रश्नाकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले. त्या म्हणाल्या की, यंदा मराठवाडा व नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांवर झालेले परिणाम पाहता सोयाबीन खरेदीच्या निकषात काही अंशी शिथिलता येणे अपेक्षित होते. उलटपक्षी हे निकष अधिक कठोर झाल्याने शासकीय खरेदी केंद्रांवर सोयाबीनची खरेदी होत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना खुल्या बाजारात मिळेल त्या भावाने सोयाबीन विकण्याशिवाय पर्याय नाही. यातून असंख्य शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते आहे. शासनाने सुरु केलेल्या खरेदी केंद्रांचा लाभ त्यांना मिळत नसल्याने राज्य सरकारने या गंभीर विषयाची तातडीने दखल घेऊन सोयाबीनच्या शासकीय खरेदीचे निकष शिथिल करण्याबाबत तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule