
पुणे, 9 डिसेंबर (हिं.स.)। सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी पाच कोटी रुपयांच्या खर्चाचा प्राथमिक अंदाज असून, राज्य सरकारकडून दोन कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. मराठी भाषा आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलेल्या घोषणेची लवकरच पूर्तता होईल. स्थानिक उद्योजक आणि देणगीदारांच्या मदतीतून संमेलन उत्तम पार पडेल.असा विश्वास अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष आणि स्थानिक संयोजन समितीचे कार्याध्यक्ष विनाेद कुलकर्णी यांनी व्यक्त केला.
डाॅ. तारा भवाळकर यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत झालेले साहित्य संमेलन हे तालकटोरा स्टेडियममध्ये झाले होते. त्यामुळे संयोजक संस्थेचा मंडप उभारणीचा मोठा खर्च वगळला गेला होता. सातारा येथे मोठा खर्च हा मंडप उभारणीचा असेल.साहित्य संंमेलनाच्या अनुदानासाठी दरवर्षी विजयादशमीला अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या खात्यामध्ये दोन कोटी रुपये जमा करण्याची घोषणा तत्कालीन सांस्कृतिक आणि मराठी भाषामंत्री विनोद तावडे यांनी केली होती. त्यानुसार काही वर्षे त्याची कार्यवाही झाली. मात्र, यंदा त्यासाठी सामंत यांच्याकडे पाठपुरावा करावा लागल्याचे कुलकर्णी म्हणाले.साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाच्या अनावरण कार्यक्रमात उद्योगांचे सामाजिक उत्तरदायित्व अंतर्गत (सीएसआर) उद्योजकांकडून एक कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा उदय सामंत यांनी केली होती. त्याची लवकरच पूर्तता होईल, असा विश्वास कुलकर्णी यांनी व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु