
छत्रपती संभाजीनगर, 9 डिसेंबर (हिं.स.)।
राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर यांनी आरोग्य विभागाच्या मराठवाडा परिमंडळस्तरीय आढावा बैठक पार पडली. या बैठकीत शासकीय रुग्णालयांमध्ये दिल्या जाणाऱ्या सेवांबाबत, कामाच्या दर्जाबाबत तसेच स्वच्छता, लॉन्ड्री व्यवस्था आणि रुग्ण आहार या सेवांकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना दिल्या.
कंत्राटदारांकडून मिळणाऱ्या सेवांची बिले प्रत्यक्ष तपासणी न करता मंजूर करू नयेत. कुठेही चुकीचे काम होऊ नये याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काटेकोर लक्ष द्यावे.
रुग्णालयातील बेडशीट्स दररोज रंगानुसार बदलणे, परिसर स्वच्छ ठेवणे, रुग्णांना चांगला पोषक आहार देणे, उपलब्ध यंत्रणेकडून अचूक काम करून घेणे ही वरिष्ठांची जबाबदारी असुन, मूलभूत सेवांमध्ये कुठलीही कसूर सहन केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले.
या बैठकीत फील्ड व्हिजिटवर विशेष भर देण्यात यावा, सर्व अधिकाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांना नियमित भेट द्यावी. कम्युनिटी हेल्थ ऑफिसर, आशा स्वयंसेविका आणि आरोग्य कर्मचारी यांनी सातत्याने गृहभेटी द्याव्यात अशा सूचना दिल्या आहेत.
यावेळी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा आढावा घेतला. या महत्वाच्या योजनेची प्रभावी अंमलबजावनी ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांशी यावेळी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
या बैठकीस आरोग्य विभागाच्या सहसंचालक डॉ. सुनिता गोल्हाईत, उपसंचालक डॉ. कांचन वानेरे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.शिवाजी सुक्रे , डीन मेडिकल कॉलेज, मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांतील वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis