
मुंबई, 9 डिसेंबर (हिं.स.)। मोटोरोलाने भारतात आपल्या नव्या स्मार्टफोनची लाँच डेट जाहीर केली आहे. कंपनीचा अपकमिंग स्मार्टफोन मोटोरोला एज ७० भारतीय बाजारात १५ डिसेंबर २०२५ रोजी लाँच होणार आहे. ही माहिती कंपनीने अधिकृत एक्स अकाउंटवरून जाहीर केली असून, या फोनसाठी फ्लिपकार्ट वर खास मायक्रोसाइटदेखील लाईव्ह करण्यात आली आहे. हा स्मार्टफोन मोटोरोलाच्या अधिकृत वेबसाइटसोबतच फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.
हा स्मार्टफोन पँटोन ब्रॉन्झ ग्रीन, पँटोन गॅजेट ग्रे आणि पँटोन लिली पॅड अशा आकर्षक रंगांमध्ये सादर केला जाणार आहे. कंपनीने याला अतिशय स्लिम डिझाइन दिले असून फोनची जाडी अवघी 5.99 मिमी आहे. तसेच या फोनचे वजन फक्त 159 ग्रॅम असल्याने तो अत्यंत हलका आणि हातात वापरण्यास सोयीस्कर ठरणार आहे.
मोटोरोला एज ७० मध्ये 6.7 इंचाची अमोलेड डिस्प्ले देण्यात आली असून, तिला 1.5K रेझोल्यूशन आणि तब्बल 4500 निट्स पर्यंत पीक ब्राइटनेस मिळतो. स्क्रीनच्या संरक्षणासाठी यात Gorilla Glass 7i वापरण्यात आले आहे. तसेच डॉल्बी अॅटमॉस सपोर्टमुळे व्हिडिओ आणि म्युझिकचा अनुभव अधिक समृद्ध मिळणार आहे. हा फोन MIL-STD 810H सर्टिफिकेशनसह येणार असून, IP68 आणि IP69 रेटिंगमुळे पाणी, धूळ व रफ यूजनाही सहज तोंड देऊ शकतो. याचा फ्रेम एअरक्राफ्ट ग्रेड अॅल्युमिनियमचा बनवण्यात आला असल्याने फोन अधिक मजबूत आणि प्रीमियम लुक देतो.
परफॉर्मन्ससाठी या फोनमध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 7 जेन 4 चिपसेट देण्यात आला आहे. सॉफ्टवेअरच्या बाबतीत हा फोन अँड्रॉइड 16 आधारित हॅलो यूआय वर चालेल. कंपनीकडून तीन वर्षांचे मोठे ओएस अपडेट्स आणि चार वर्षांची सुरक्षा अपडेट्स मिळण्याची शक्यता वर्तवलीय जात आहे.
बॅटरीबाबत बोलायचे झाले तर या फोनमध्ये 5000mAh सिलीका-कार्बन बॅटरी देण्यात आली आहे. या बॅटरीला 68W वायर्ड आणि 15W वायरलेस चार्जिंगचा सपोर्ट मिळतो. दीर्घकाळ गेमिंग किंवा हेवी वापर करताना फोन गरम होऊ नये यासाठी Vapor Cooling Chamber टेक्नॉलॉजीही देण्यात आली आहे.
कॅमेऱ्याच्या बाबतीत मोटोरोला एज ७० मध्ये दमदार सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा OIS सपोर्टसह देण्यात आला असून, 50MP चा अल्ट्रावाइड + मॅक्रो लेन्सही आहे. हा फोन 4K रेझोल्यूशनवर 60fps पर्यंत व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकतो. तसेच सेल्फीसाठी 50MP क्वाड पिक्सेल फ्रंट कॅमेरा देण्यात आला असून, यामुळे फोटो आणि व्हिडिओ कॉलिंगचा अनुभव अधिक स्पष्ट आणि दर्जेदार मिळणार आहे. हा स्मार्टफोन आपल्या स्लिम डिझाइन, दमदार फीचर्स आणि प्रीमियम बिल्ड क्वालिटीमुळे भारतीय बाजारात मोठी चर्चा निर्माण करणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule