विधानपरिषदेत सूर्यकांत मोरेविरोधात हक्कभंग प्रस्ताव
नागपूर, 09 डिसेंबर (हिं.स.) : अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड नगरपरिषद निवडणूक प्रचारादरम्यान विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि सभागृहातील सदस्यांविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) पदाधिकारी सूर्यकांत मोरे
विधानपरिषदेत सूर्यकांत मोरेविरोधात हक्कभंग प्रस्ताव


नागपूर, 09 डिसेंबर (हिं.स.) : अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड नगरपरिषद निवडणूक प्रचारादरम्यान विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि सभागृहातील सदस्यांविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) पदाधिकारी सूर्यकांत मोरे यांच्या विरोधात मंगळवारी विधानपरिषदेत हक्कभंग प्रस्ताव सादर करण्यात आला. हा प्रस्ताव विधानपरिषद सदस्य प्रवीण दरेकर आणि श्रीकांत भारतीय यांनी मांडला.

गेल्या 23 नोव्हेंबर रोजी रोहित पवार यांच्या सभेत मोरे यांनी विधानपरिषदेचे कामकाज, रचना आणि सदस्यांविषयी अवमानजनक टिप्पणी केली होती. सभापती प्रा. शिंदे यांच्याविषयी “ते कायदेपंडित आहेत का ?” असा सवाल करत त्यांनी सभागृहाच्या “लाल कार्पेट”चा उल्लेखही दुष्काळाचे प्रतीक असा करून अवमान केला होता. आमदारांच्या लाल बिल्ल्यालाही कुणी किंमत देत नाही, अशी टीका त्यांनी केल्याचा आरोप आहे.

दरेकर आणि भारतीय म्हणाले की, विधानपरिषद ही गौरवशाली परंपरेची संस्था आहे. मोरे यांनी या परंपरेचा अपमान केला आहे. त्यांच्या विरोधात कठोर कारवाईसह फौजदारी गुन्हा दाखल करावा. प्रस्तावाला संजय खोडके यांनी अनुमोदन दिले. मात्र त्यांनी हक्कभंग नोटीस अनेकदा स्वीकारली जात नसल्याची तक्रार करत हक्कभंग समितीची पुनर्रचना करण्याची मागणी मांडली.

शिवसेनेचे अनिल परब यांनीही प्रस्तावाचे समर्थन करताना म्हणाले की, हा राजकीय वादाचा नव्हे तर विधानपरिषदेच्या अस्मितेचा प्रश्न आहे. सभागृहाच्या ‘लाल कार्पेट’ची ताकद दाखविण्याची ही वेळ आहे. प्रचारसभेदरम्यान रोहित पवार आणि उद्धव सेनेच्या सुषमा अंधारे उपस्थित असल्याने त्यांच्यावरही कारवाईचा विचार व्हावा, अशी मागणी काही सदस्यांनी केली.दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) अमोल मिटकरी यांनी आक्रमक भूमिका घेत मंचावरील जे नेते मोरे यांच्या वक्तव्यावर हसून मूक संमती देत होते, त्यांच्यावरही कारवाई व्हावी, अशी मागणी केली. --------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande