
नागपूर, 9 डिसेंबर (हिं.स.)। महिला व बाल सुधारगृहातून मुली, महिला पळून जाऊ नयेत यासाठी शासन संवेदनशीलपणे काम करत आहे. यासाठी आवश्यक उपाय योजना करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. याचबरोबर महिला व बाल सुधारगृहातून पळून जाण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू असल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधान परिषदेत दिली.
सदस्य चित्रा वाघ यांनी राज्यातील महिला व बाल सुधारगृहाच्या सुरक्षा व व्यवस्थापनातील त्रुटींमुळे मुलींनी पलायन केल्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.
मंत्री तटकरे यांनी सांगितले, महिला व बाल सुधारगृहात तसेच महिला वसतिगृहात असणाऱ्या महिला व बालकांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य दिले आहे. सध्या बाल सुधारगृहातून मुलांचे पलायनाचे प्रमाण ०.२९ टक्के तर महिलांचे तीन टक्के इतके आहे. बाल सुधारगृहातून पलायनाचे प्रमाण शून्य टक्के पर्यंत आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी बाह्ययंत्रणेद्वारे भरलेल्या कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण देण्याचे निर्देश देण्यात आले आहे. जी पदे भरण्याची प्रक्रिया प्रलंबित आहेत त्यांची भरती एक महिन्यात करण्याबाबत कार्यवाही केली जाईल.
उल्हासनगर येथील शांती सदन वसतिगृहातील घटनेसंदर्भात अधिक माहिती देताना मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले, उल्हासनगर येथील शांती सदन वसतिगृहात घटना घडली त्या दिवशी एकूण १२ महिला प्रवेशित होत्या. त्यापैकी तीन बांगला देशातील, एक बिहार, एक गुजरात, एक पश्चिम बंगाल तसेच सहा महिला महाराष्ट्रातील होत्या. वसतिगृहाची क्षमता १०० असली तरी त्यावेळी केवळ २१ महिला तिथे राहत होत्या. सुरक्षा व्यवस्थेत एक सुरक्षा रक्षक आणि एक महिला पोलीस कर्मचारी तैनात होते. एफआयआरनुसार प्रवेशित महिलांनी दोन्ही सुरक्षा कर्मचारी यांना मारहाण करून लॉक करून सहा फूट उंच भिंत ओलांडून पलायन केले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत दिसत आहे.
पळून गेलेल्या १२ महिलांपैकी ११ महिला अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा (आयटीपीए) अंतर्गत कल्याण-डोंबिवली परिसरातील विविध ठिकाणांवरून सुटका करून संस्थेत दाखल करण्यात आल्या होत्या. एक महिला ठाणे परिसरातून दाखल करण्यात आली होती. सर्व महिला १९ ते ५० वयोगटातील होत्या.
उल्हासनगर येथील वसतिगृहातील सुरक्षा वाढवण्यासाठी भिंतीची उंची वाढवण्याचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठविण्यात आला आहे. वसतिगृहातील सुरक्षा, सोयी सुविधा, कर्मचारी भरती या संदर्भात सविस्तर बैठक घेण्यात येईल. तसेच अशा घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील. वसतिगृहात १२ मंजूर पदे असून सात पदे भरलेली तर पाच पदे रिक्त आहेत. बाह्ययंत्रणेद्वारे नियुक्त केलेली चार पदे कार्यरत आहेत. सुरक्षा व्यवस्थेसाठी गृह विभागाकडे अधिक पोलीस बंदोबस्त मागितला असल्याचेही महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule