
जळगाव, 9 डिसेंबर, (हिं.स.) नगरदेवळा ता. पाचोरा येथील सुतगिरणीजवळ मंजुर असलेल्या एमआयडीसीच्या अंतर्गत कामांच्या अनुशंगाने राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली १० डिसेंबर रोजी दुपारी सव्वा चार वाजता नागपुर येथे अधिकाऱ्याची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
यासंदर्भात आमदार किशोर पाटील यांनी उद्योग मंत्री यांना पत्र दिले होते. त्याची दखल घेत ही बैठक लावण्यात आली आहे. आमदार किशोर पाटील यांच्या प्रयत्नांतून नगरदेवळा येथे सुमारे अडीचशे एकर क्षेत्रावर एमआयडीसी मंजुर झाली आहे. तेथील जागा आरक्षित करून तेथे उद्योग उभारणीसाठी प्लाॅटींगचे काम पुर्ण झाले आहे. तर आता उद्योग उभारण्यासाठी येथे उद्योगासाठी आवश्यक मुलभूत सुविधा असणे आवश्यक आहे. त्याबाबत आमदार किशोर पाटील यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांना पत्र दिले होते.त्याअनुशंगाने मंत्री उदय सामंत यांनी १० डिसेंबर रोजी नागपुर येथे औद्योगिक वसाहतीच्या मुख्य कार्यालयात दुपारी सव्वा चार वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बैठकीला एमआयडीसीचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे एमआयडीसीला चालना मिळण्यास मदत होणार आहे.
दरम्यान नगरपरिषदे च्या निवडणुकीच्या वेळेचे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रचारासाठी आले होते. तेव्हा सभेतूनच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांना काॅल करून नगरदवेळा सूतगिरणी येथील मंजुर एमआयडीसीत आवश्यक सुविधा आणि उद्योग उभारण्याबाबत सुचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने एमआयडीसी ला चालना मिळाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर