
सोलापूर, 9 डिसेंबर (हिं.स.)। सुरत – गुजरात प्रांत पद्मशाली युवजन संघम तर्फे आयोजित भव्य युवा मेळावा आणि गुजरात प्रांत पदाधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात सुरत येथे पार पडली. पद्मशाली युवजन संघमचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास संगा यांच्या अध्यक्षतेखाली, तर अखिल भारत पद्मशाली संघाचे अध्यक्ष कंदाकटला स्वामीजी आणि महेश जिंदम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा भव्य सोहळा पार पडला.मेळाव्याची सुरुवात समाजाचे कुलदैवत भगवान श्री मार्कंडेय महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यानंतर सादर झालेल्या भरतनाट्यम नृत्याने कार्यक्रमाला कलात्मकतेची सुंदर सजावट लाभली. समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांच्या उज्ज्वल भवितव्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
गुजरात सुरत प्रांत पदाधिकाऱ्यांची निवड सर्वानुमते पार पडली. नवीन निवडलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये नागराजु सामानतुला (युवक अध्यक्ष), वेणू मारा (जनरल सेक्रेटरी), अंबादास आडम (खजिनदार), रोहित हरिदास जाटला (जॉईंट सेक्रेटरी), मेहुल कामंवार (व्हाईस प्रेसिडेंट), राकेश बोगा (रिसर्च अँड डेव्हलपमेंट), राजू तालापल्ली (वर्किंग प्रेसिडेंट), नित्यानंद मुनगापाटी (व्हाईस प्रेसिडेंट) तसेच इतर समिती सदस्यांचा समावेश आहे. निवडीदरम्यान उपस्थितांकडून प्रचंड उत्साह व्यक्त करण्यात आला.मेळाव्यात समाजाच्या प्रश्नांवर सखोल चर्चा होऊन अनेक महत्त्वाचे ठोस निर्णय घेण्यात आले. समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी नवीन उपक्रम राबविण्याचे ठरविण्यात आले. शैक्षणिक प्रगती, रोजगारनिर्मिती, उद्योजकता विकास, वंचित घटकांचे पुनर्वसन, युवा संघटनांची मजबुती या मुद्द्यांवर विशेष भर देण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड