

मुंबई, 9 डिसेंबर (हिं.स.)। पोकोने भारतीय बाजारात आपला नवीन 5G स्मार्टफोन ‘पोको सी८५ ५जी’ अधिकृतपणे लॉन्च केला आहे. बजेट सेगमेंटमधील हा स्मार्टफोन दमदार बॅटरी, मोठी डिस्प्ले आणि शक्तिशाली प्रोसेसरसह सादर करण्यात आला असून तरुण ग्राहकांना लक्ष्य करून डिझाइन करण्यात आला आहे. या फोनमध्ये 6.9 इंचाची मोठी एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आली असून, 120Hz अॅडॅप्टिव्ह रिफ्रेश रेटमुळे स्क्रोलिंग आणि व्हिडिओ पाहण्याचा अनुभव अधिक स्मूथ होतो. स्क्रीनला TÜV Rheinland कडून लो ब्लू लाइट, फ्लिकर-फ्री आणि सर्केडियन फ्रेंडली सर्टिफिकेशन मिळाले आहे, त्यामुळे दीर्घकाळ वापर करताना डोळ्यांवर कमी ताण येतो.
किमतींबाबत सांगायचे तर, 4GB RAM आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 12,999 रुपये ठेवण्यात आली असून, सध्या ऑफरअंतर्गत तो 11,999 रुपयांत उपलब्ध आहे. 6GB RAM वेरिएंटची किंमत 13,499 रुपये असून, ऑफरमध्ये तो 12,999 रुपयांत मिळत आहे. तर 8GB RAM आणि 128GB स्टोरेज असलेला टॉप वेरिएंट 14,499 रुपयांच्या किमतीत बाजारात आणण्यात आला आहे. ग्राहक हा स्मार्टफोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकतात.
या स्मार्टफोनमध्ये 6nm तंत्रज्ञानावर आधारित मीडियाटेक डायमेन्सिटी 6300 चिपसेट देण्यात आला असून, त्यासोबत Mali-G57 MC2 GPU मिळतो. त्यामुळे गेमिंग आणि मल्टीटास्किंगसाठी हा फोन अधिक सक्षम ठरतो. Poco C85 5G मध्ये 8GB पर्यंत LPDDR4x RAM आणि 128GB अंतर्गत स्टोरेज देण्यात आले आहे. मायक्रो SD कार्डच्या मदतीने ही स्टोरेज 1TB पर्यंत वाढवण्याची सुविधा देखील देण्यात आली आहे. हा फोन Android 15 वर आधारित HyperOS 2.2 वर काम करतो. कंपनीकडून या फोनसाठी दोन वर्षांचे अँड्रॉइड अपडेट्स आणि चार वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स देण्याचा दावा करण्यात आला आहे.
फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. मुख्य कॅमेरा 50 मेगापिक्सेलचा असून f/1.8 अपर्चरसह येतो, तर दुसरा कॅमेरा QVGA सेन्सर आहे. समोरच्या बाजूला 8 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला असून तो व्हिडिओ कॉलिंगसाठी उपयुक्त ठरतो. सुरक्षेसाठी या फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. याशिवाय, हा फोन IP64 रेटिंगसह येत असल्यामुळे पाणी आणि धुळीपासून काही प्रमाणात सुरक्षित राहतो.
बॅटरीबाबत बोलायचे झाल्यास, पोको सी८५ ५जी मध्ये 6000mAh क्षमतेची मोठी बॅटरी देण्यात आली आहे, ज्यामुळे एकदा चार्ज केल्यानंतर दीर्घकाळ फोन वापरता येतो. डिझाइनच्या बाबतीत हा फोन मिस्टिक पर्पल, स्प्रिंग ग्रीन आणि पावर ब्लॅक या आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे.
मोठी स्क्रीन, दमदार बॅटरी आणि 5G कनेक्टिव्हिटीमुळे पोको सी८५ ५जी हा स्मार्टफोन बजेट सेगमेंटमधील ग्राहकांसाठी एक आकर्षक पर्याय ठरण्याची शक्यता आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule