
पुणे, 9 डिसेंबर (हिं.स.)। निवडणुकांच्या तोंडावर शहरातील इच्छुकांकडून मोठ्या प्रमाणात अनधिकृत फ्लेक्स, बोर्ड, बॅनर्सच्या जाहिराती लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे शहरात विद्रूपीकरण होत असून, आता अशा अनधिकृत जाहिरात फलकांना आता थेट १५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार असून, राजकीय व्यक्तींनी लावलेल्या फ्लेक्सवरही कोणतीही सूट न देता पुढील दोन दिवसांत सर्वांना नोटिसा बजावून अनधिकृत जाहिराती काढल्या जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
आयुक्तांनी तीन महिन्यांपूर्वी याबाबत आदेश दिले होते. त्यानंतर काही प्रमाणात दंडात्मक कारवाई, तसेच गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र, त्यानंतर पुन्हा शहरात मोठ्या प्रमाणात फ्लेक्स वाढले आहेत. शहरातील विद्युत खांब, पथदिवे, सिग्नलचे खांब, चाैक, सार्वजनिक ठिकाणे येथे वाढदिवस, शुभेच्छा, विविध कार्यक्रम आदी कारणांनी मोठ्या प्रमाणात फ्लेक्सबाजी केली जाते.आकाशचिन्ह, परवाना विभाग, तसेच अतिक्रमण विभागाकडून कारवाई होत असली तरी राजकीय दबावामुळे अनेकदा कारवाईकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे शहराचे विद्रूपीकरण तर होतेच; शिवाय महापालिकेचे उत्पन्नही बुडते. त्यामुळे निवडणुकांच्या तोंडावर पुन्हा एकदा राजकीय फ्लेक्सकडे दुर्लक्ष झाल्याची बाब पुढे आली. या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी सोमवारी आकाशचिन्ह व परवाना विभागाला कारवाई अधिक तीव्र करण्याचे आदेश दिले असून, राजकीय फ्लेक्सबाजीवर खास भर देण्यास सांगितले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु