
पुणे, 9 डिसेंबर (हिं.स.)। ग्रामीण भागातील महिला बचत गटांसह महिला उद्योजिकांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ मिळवून देणारी ‘भीमथडी जत्रा’ पुणेकरांना यंदा नव्या रूपात पाहायला मिळणार आहे. ‘भारतातील स्थानिक फुलं’ ही यंदाची थीम असल्याने ‘भीमथडी’च्या माध्यमातून देशातील स्थानिक वनस्पतींचे जतन केले जाणार आहे. ‘अॅग्रीकल्बरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती’, ‘भीमथडी फाउंडेशन व ‘महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी’ यांच्या सयुंक्त विद्यमाने आयोजित ही यात्रा २० ते २५ डिसेंबर दरम्यान सकाळी १० ते रात्री १० या वेळेत सिंचननगर येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानात पार पडणार आहे, अशी माहिती जत्रेच्या आयोजक सुनंदा पवार यांनीपत्रकार परिषदेत दिली.
जत्रेचे हे १९ वे वर्ष आहे. राज्यातील २४ हून अधिक जिल्ह्यासह देशातील १२ राज्यांमधून महिला बचत गट, महिला उद्योजिका यासह विविध कारागीर जत्रेत सहभागी होणार आहेत. तर खवय्यांसाठी ग्रामीण भागातील शाकाहारी व मांसाहारी भोजनाचे ८५ पेक्षा जास्त स्टॉल असणार आहेत. अर्बन-किचन गार्डनिंगमध्ये लहान जागेत, कमी खर्चात विषमुक्त भाजीपाला उत्पादन घरच्या घरी बनविता येईल याचे प्रात्यक्षिक पुणेकरांना जत्रेत पाहता येणार आहे. जत्रेत प्रवेश करतानाच नागरिकांना मुगल बागेच्या सौंदर्यावर आधारित फुलांनी सजविलेल्या भव्य प्रवेशद्वारावर स्वागत केले जाणार आहे, अशी माहिती पवार यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु