
पुणे, 9 डिसेंबर (हिं.स.)आगामी महापालिका निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाने (भाजप) इच्छुकांकडून मागविलेल्या उमेदवारी अर्जांना मोठा प्रतिसाद मिळाला. दिवसभरात २१३५ अर्ज इच्छुकांनी नेले असून, ६०० अर्ज शहर भाजप कार्यालयाकडे जमा करण्यात आले.भाजपने सुकाणू समितीच्या बैठकीनंतर उमेदवारी अर्ज देण्यास सुरुवात केली आहे. पक्ष कार्यालयांमध्ये दोन दिवस इच्छुकांना उमेदवारी अर्जांचे वाटप केले जाईल.
अर्ज वाटपाच्या पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात इच्छुकांची गर्दी पक्ष कार्यालयात झाल्याचे पाहायला मिळाली. म्हात्रे पुलावरील डीपी रस्त्यावर असलेल्या भाजपच्या पक्ष कार्यालयात निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी गर्दी केली होती. अर्जासाठी भाजप कोणतेही शुल्क घेत नाही. त्यामुळे गर्दी झाल्याचे बोलले जात आहे.महापालिकेची आगामी निवडणूक भाजप स्वबळावर लढणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. महापालिकेच्या ४१ प्रभागांमध्ये १६५ जागांपैकी १२५ जागा जिंकण्याचे उद्दिष्ट भाजपने डोळ्यासमोर ठेवले आहे. प्रत्येक प्रभागांमध्ये चार जागांसाठी वीस इच्छुक पक्षांकडून मैदानात उतरण्यासाठी शक्यता आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु