
पुणे, 9 डिसेंबर (हिं.स.)। जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी बहुभाषिक व्हावेत, असा प्रशासनाचा आग््राह असून त्यासाठी प्रत्यक्ष उपक्रमांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेच्या 102 शाळांतील शिक्षकांनी जर्मन आणि फ्रेंच भाषेचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. परिणामी, जिल्हा परिषद शाळांमधील इयत्ता 5 वी ते 8 वीतील जवळपास 12 हजार विद्यार्थ्यांना आता जर्मन व फ्रेंच भाषा शिकविण्यास सुरुवात झाली आहे.
शिक्षकांना जर्मन व फ्रेंच भाषेचे प्रशिक्षण देण्यासाठी जिल्हा परिषद आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्यात करार करण्यात आला होता. या करारानुसार 102 शिक्षकांना 180 तासांचे ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात आले. यात दोन्ही भाषांतील शब्दसंपत्ती, उच्चार, काळ इत्यादी मूलभूत विषयांचे मार्गदर्शन करण्यात आले. आता हेच शिक्षक प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना परकीय भाषा शिकवणार आहेत.‘फॉरेन लँग्वेज ऑनलाइन ॲप्लिकेशन’ यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत जर्मन व फेंच या भाषांतील अनुवादांसह व्हिडीओ आणि इतर अध्यापन साहित्य तयार करण्यात आले आहे. हे साहित्य पेनड्राइव्हच्या माध्यमातून शिक्षकांना नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात वितरित करण्यात आले. कार्यक्रमाला जिल्ह्यातील विविध शाळांमधील परदेशी भाषा शिक्षक व मुख्याध्यापक उपस्थित होते. विद्यार्थ्यांना जर्मन आणि फ्रेंच शिकवण्यासाठी आवश्यक अभ्यासक्रमाची माहितीही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु