सोलापूर - गेल्या वर्षीच्या तुलनेत रब्बी ज्वारीच्या क्षेत्राचा विमा घटल्याचे चित्र
सोलापूर, 9 डिसेंबर, (हिं.स.)। रब्बी हंगामातील पीक विमा योजनेत गेल्यावर्षाच्या तुलनेत रब्बी ज्वारीच्या क्षेत्राचा विमा घटल्याचे चित्र आहे. ही घट तब्बल अडीच लाख हेक्टरची असून विमा हप्त्याची रक्कम वाढल्यामुळेच शेतकऱ्यांनी या योजनेकडे पाठ फिरवल्याचे दि
सोलापूर - गेल्या वर्षीच्या तुलनेत रब्बी ज्वारीच्या क्षेत्राचा विमा घटल्याचे चित्र


सोलापूर, 9 डिसेंबर, (हिं.स.)। रब्बी हंगामातील पीक विमा योजनेत गेल्यावर्षाच्या तुलनेत रब्बी ज्वारीच्या क्षेत्राचा विमा घटल्याचे चित्र आहे. ही घट तब्बल अडीच लाख हेक्टरची असून विमा हप्त्याची रक्कम वाढल्यामुळेच शेतकऱ्यांनी या योजनेकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे, तर यंदाच्या हंगामात पावसाळ्यात चांगला पाऊस झाल्यामुळे रब्बीत उत्पादन चांगले राहील, अशी शक्यता असल्यानेच विमा उतरवण्याचे प्रमाण कमी असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. राज्यातील १९ जिल्ह्यांमधील ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांनी १ लाख हेक्टरवरील विमा उतरविला असून सर्वाधिक २२ हजार हेक्टरवरील विमा एकट्या सोलापूर जिल्ह्यात उतरविण्यात आला आहे.

नैसर्गिक आपत्तीत पिकांच्या होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण मिळवण्यासाठी खरीप आणि रब्बी हंगामात पीक विमा योजना राबवली जाते. गेल्या वर्षापर्यंत दोन्ही हंगामातील पीक विमा योजना शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात उपलब्ध करून देण्यात येत होती. मात्र, त्यातील गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर राज्य सरकारने शेतकऱ्यांचा हिस्सा भरण्यास नकार देत जिल्हानिहाय तसेच पीकनिहाय विमा हप्ता पूर्वीप्रमाणेच करण्याचा निर्णय घेतला. परिणामी, खरीप हंगामात विमा उतरवणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी झाली.

गेल्यावर्षी एक रुपयात विमा असल्याने ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांनी मोठा सहभाग नोंदविला होता. मात्र, यंदा जिल्हानिहाय विमा हप्त्याची रक्कम वेगवेगळी असल्याने शेतकऱ्यांनी विमा उतरवण्याकडे पाठ फिरवली आहे, तर यंदा पावसाळ्यात मोठा पाऊस झाला. परिणामी, रब्बी हंगामात ज्वारीचे क्षेत्र वाढले आहे, उत्पादनातही वाढ होण्याचा अंदाज आहे. तसेच हवामानाचा अंदाज बघता नैसर्गिक आपत्तीची शक्यता कमी आहे. त्यामुळेच विमा उतरवण्याकडे शेतकऱ्यांचा कल कमी असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande