
-एकजुटीच्या भावनेतून डोंबिवलीला एकत्र करणे
डोंबिवली, 9 डिसेंबर (हिं.स.)। रोटरी क्लब ऑफ डोंबिवली डाउनटाउनने आयोजित केलेल्या विद्यार्थ्यांची मॅरेथॉन, स्कूल आर-ॲथॉन 2025 साठी आपण सहयोग केल्याची घोषणा रुस्तमजी ग्रुपने केली. डोंबिवलीतील रुस्तमजी ड्राइव्ह रोडवरील अर्बन वुड्सजवळ ही मॅरेथॉन झाली. यंदाच्या मॅरेथॉनचे वैशिष्ट्य म्हणजे, आर्थिकदृष्ट्या मागास मुलांसाठी बालरोग हृदय शस्त्रक्रियांसाठी निधी उपलब्ध करून देणे. 2,200 तरुण धावपटू, कुटुंबे, शिक्षक आणि राजकीय नेत्यांसह 5,000 हून अधिक लोकांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती. 2 किमी, 3 किमी आणि 5 किमी अंतराची ही मॅरेथॉन म्हणजे फिटनेस, अनुकंपा आणि सामाजिक सहभागाला प्रोत्साहन देणारा अर्थपूर्ण मंच ठरला.
हृदयरोगासाठीच्या काळजीची तातडीने गरज असलेल्या मुलांना मदत करण्यासाठी स्कूल आर-ॲथॉन 2025 हा उपक्रम राबवला जात आहे. गेल्या 18 वर्षांहून अधिक काळ सामाजिक विकासासाठी प्रयत्नशील राहून विविध सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या रोटरी क्लब ऑफ डोंबिवली डाउनटाउनने 18 मुलांची ओळख पटवली आहे, ज्यांना तत्काळ बालरोग हृदयरोग शस्त्रक्रियांची आवश्यकता आहे. या मॅरेथॉनमधून मिळणारे उत्पन्न थेट या शस्त्रक्रियांसाठी म्हणून वापरले जाईल. ज्यामुळे मुलांना निरोगी जीवन जगण्याची संधी मिळेल. सध्या 2000 हून अधिक मुले अशाच प्रकारच्या प्रक्रियांसाठी रुग्णालयाच्या प्रतीक्षा यादीत आहेत. यंदाच्या मॅरेथॉनमधून या कारणाची निकड तसेच महत्त्व अधोरेखित होते.
या भागीदारीबद्दल रुस्तमजी ग्रुपचे कार्यकारी संचालक चंद्रेश मेहता म्हणाले, “जेव्हा कुटुंबे सामायिक उद्देशाने एकत्र येऊन कल्याण, शिक्षणासाठी प्रयत्न करतात तेव्हा ते चैतन्यशील समाज निर्माण करतात, असा आमचा विश्वास आहे. स्कूल आर-ॲथॉन हा एक अनोखा मंच आहे, जो मुलांमधील हृदयरोगासाठी मदतीचा एक अर्थपूर्ण हात देण्यासाठी मुलांमध्येच जागरूकता, जबाबदारी जागवत सक्रिय जीवनशैली स्वीकारण्यास प्रोत्साहित करतो. या उपक्रमाला पाठिंबा देण्याचा आणि डोंबिवलीतील लोकांशी आमचे नाते अधिक दृढ करण्याचा आम्हाला अभिमान आहे.”
या कार्यक्रमाबद्दल रोटरी क्लब ऑफ डोंबिवली डाउनटाउनच्या अध्यक्षा रोटरिअन कीर्ती शेट्टी म्हणाल्या, ही मॅरेथॉन म्हणजे सामूहिक प्रयत्नांची शक्ती तसेच एखादा ठोस उद्देश आणि दृढनिश्चयाने धावणाऱ्या तरुणांच्या निश्चयाचे प्रतिबिंब आहे. या मॅरेथॉनमधून जमा झालेला निधी वंचित कुटुंबातील मुलांच्या हृदय शस्त्रक्रिया आणि इतर वैद्यकीय मदतीसाठी वापरला जाईल. लहान वयातच उत्तम आरोग्य सवयी लावणे तसेच योग्य वयात व्यायामाचे महत्त्व सांगण्याबरोबरच, मुलांमध्ये आपण समाजाचे देणे लागतो ही भावना रुजवणे तसेच सामाजिक विकास उपक्रमांचा भाग बनण्यास प्रवृत्त करणे हे देखील या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. रुस्तमजी सारख्या भागीदारांकडून मिळालेला पाठिंबा ही उद्दिष्टे साध्य करण्यात खूप सहाय्यक ठरतो.
रवींद्र चव्हाण (अध्यक्ष - भाजपा, महाराष्ट्र राज्य), रोटरियन हर्ष मकोल (जिल्हाधिकारी 25-26 आरआयडी 3142), राजेश मोरे (आमदार, शिवसेना - कल्याण ग्रामीण), आणि सुलभा गायकवाड (आमदार, भाजपा - कल्याण ग्रामीण) यांच्यासह या भागाच्या नागरी आणि सामाजिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मान्यवर प्रमुख पाहुण्यांनी या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला.
गेल्या वर्षी या मॅरेथॉनमध्ये तरुण धावपटू आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र आले होते, ज्यामुळे डोंबिवलीतील एकता आणि उद्देशाच्या वाढत्या भावनेला बळकटी मिळाली. तीच भावना यंदाही कायम राहिली आणि तरुणांचा अधिकाधिक सहभाग दिसला. आरोग्य तसेच सामाजिक जबाबदारीबाबत वाढती जागरूकता यातून समोर येते. हा कार्यक्रम म्हणजे केवळ एक शर्यत नाही तर ती एक चळवळ आहे, जी मुलांना त्यांच्या ताकदीवर विश्वास ठेवण्यास, कुटुंबांना एकत्र उभे राहण्यास आणि स्वतःपेक्षा मोठ्या गोष्टीसाठी धावण्यास प्रेरित करते. व्यापकतेसह तसेच दृढ भावनिक सहभागासह, या मॅरेथॉनने अर्थपूर्ण बदल घडवून आणण्यासाठी एकत्र येण्याच्या शक्तीचे महत्त्व पटवून दिले.
2025च्या मॅरेथॉनचा समारोप पुरस्कार समारंभाने झाला. यात सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले तसेच विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. प्रत्येक तरुण धावपटूचा उत्साह, त्याचे प्रयत्न आणि दृढनिश्चप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक प्रगतीवर लक्ष केंद्रित करत कुटुंबांची काळजी घेणारे आणि जीवन समृद्ध करणारे वातावरण निर्माण करण्याच्या रुस्तमजींच्या दीर्घकालीन दृष्टिकोनाशी स्कूल आर-ॲथॉन सुसंगत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule