
नागपूर, 9 डिसेंबर (हिं.स.)। संत मुक्ताई मंदिर तीर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. शिखर समितीकडून मान्यता मिळताच उर्वरित कामे पूर्ण करण्यात येणार असल्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.
विधानपरिषद सदस्य एकनाथ खडसे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते.
जळगाव जिल्ह्यातील कोथळी येथील संत मुक्ताई मंदिर तिर्थक्षेत्राच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव शिखर समितीकडे पाठविण्यात आला असल्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले.
संत मुक्ताई मंदिर विकासासाठी सुरुवातीला 9.8 कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्याला मान्यता मिळाल्यानंतर निधी वितरित करण्यात आला असून त्या कामांना सुरुवातही झाली आहे. कामास गती न मिळाल्याने खर्चात वाढ झाली असल्याचे मंत्री गोरे यांनी स्पष्ट केले.
मंत्री गोरे म्हणाले की, पूर्वी शासनाने 25 कोटींच्या आराखड्यालाच मान्यता दिली होती. परंतु आता बांधकाम विभागाने तयार केलेल्या नव्या विकास आराखड्याला शिखर समितीच्या मान्यतेनंतरच पुढील उर्वरित मंदिराचे काम होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर