
जळगाव, 9 डिसेंबर, (हिं.स.) - अमळनेर शहरातील पैलाड भागातील शिवाजी नगरातील सराईत गुन्हेगाराला सहा महिन्यांकरिता जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश उपविभागीय दंडाधिकारी मयूर भंगाळे यांनी पारित केले. चेतन उर्फ सत्तूकिरण धोबी (वय २०) असं हद्दपार केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.
चेतन धोबी याच्याविरुद्ध पैसे लुटणे, मोबाईल हिसकावणे, शारीरिक दुखापत करून रक्कम लुटणे, गावठी पिस्टल बाळगणे, मोटारसायकल चोरी आदी प्रकारचे चार गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यापासून शहरातील नागरिकांच्या सुरक्षेस धोका असून गावातील शांतता व कायदा व सुव्यवस्थेस घोका निर्माण झाला आहे. म्हणून पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी चेतन धोबी याला जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातून दोन वर्षे हद्दपार करण्यासाठी डीवायएसपी विनायक कोते यांच्या मार्फत उपविभागीय दंडाधिकारी मयूर भंगाळे यांच्याकडे प्रस्ताव पाठवला होता.मयूर भंगाळे यांनी नोटिसा देऊन सुनावणी घेतली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५६ (१) (अ) (ब) प्रमाणे चेतन यास सहा महिन्यांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपारचे आदेश दिले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर