सासूला मारहाण करून सोन्याचे दागिने घेऊन जावई लंपास
जळगाव, 9 डिसेंबर, (हिं.स.) सासूला मारहाण करून अंगावरील सोन्याचे दागिने जबरदस्तीने काढून पळ काढणाऱ्या जावयाविरोधात अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही धक्कादायक घटना जळोद रस्त्यावरील आर्मी स्कूलजवळ घडली. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या मिनाब
सासूला मारहाण करून सोन्याचे दागिने घेऊन जावई लंपास


जळगाव, 9 डिसेंबर, (हिं.स.) सासूला मारहाण करून अंगावरील सोन्याचे दागिने जबरदस्तीने काढून पळ काढणाऱ्या जावयाविरोधात अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही धक्कादायक घटना जळोद रस्त्यावरील आर्मी स्कूलजवळ घडली. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या मिनाबाई समाधान कोळी यांनी उपचार घेतल्यानंतर पोलिसात फिर्याद नोंदवली. पारोळा तालुक्यातील अंबापिंप्री येथील मिनाबाई यांच्या मुलीचा विवाह पंधरा वर्षांपूर्वी विनोद विक्रम कोळी (रा. खंबाळे, ता. शिरपूर) याच्यासोबत झाला होता.

तीन वर्षांपूर्वी मुलीने आत्महत्या केली असली तरी विनोद हा सासरवाडीतच राहात होता. सहा महिन्यांपूर्वी त्याने दुसरे लग्न केले, मात्र काही काळ तो अंबापिंप्री येथेच वास्तव्यास होता. चार महिन्यांपूर्वी नव्या पत्नीशी झालेल्या भांडणानंतर दोघे बिडगाव (ता. चोपडा) येथे गेले. याच दरम्यान मिनाबाई यांच्या बदनामीवरून विनोद आणि तिचा मुलगा भरत यांच्यात वाद झाला होता. विनोदने सासू मिनाबाई यांना फोन करून वाद मिटवायचा बहाणा केला आणि त्यांना पैलाड येथे बोलावले. त्या पोहोचताच त्याने त्यांना मोटरसायकलवर बसवून जळोद रस्त्यावर खदानीजवळ नेले. तेथे अचानक कुरघोडी करत त्याने मिनाबाई यांच्या गालावर चापटा मारल्या व त्यांच्याकडील ८ ग्रॅम सोन्याचे कानातील दागिने तसेच १० हजार रुपये किमतीची २ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत असे मिळून जवळपास ५० हजार रुपयांचे दागिने लंपास केले. मारहाणीत मिनाबाई बेशुद्ध पडल्या. काही वेळांनी प्रवाश्यांच्या मदतीने त्या अमळनेर येथे पोहोचल्या. त्यानंतर मुलाच्या मदतीने ग्रामीण रुग्णालयात आणि नंतर खाजगी रुग्णालयात उपचार घेतले. प्रकृती सुधारल्यानंतर त्यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी विनोद कोळीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande