
रायगड, 9 डिसेंबर (हिं.स.)। : अलिबाग येथे शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन करत विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला. अंबादास दानवे यांनी अलिबागचे आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्याविरोधात अपमानास्पद व चुकीची विधाने केल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. या पार्श्वभूमीवर दानवे यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळून आपला रोष व्यक्त करण्यात आला.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शेकडो शिवसैनिक मोठ्या संख्येने जमले होते. “अंबादास दानवे मुर्दाबाद”, “महेंद्र दळवी आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. निषेधकर्त्यांनी दानवे यांच्या वक्तव्यामुळे जनतेची दिशाभूल होऊन लोकप्रतिनिधींची प्रतिमा मलीन होत असल्याचा आरोप केला.या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी तयार केलेल्या दानवे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला चपला घालून निषेध करण्यात आला. त्यानंतर पुतळा पेटवून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. या घटनेमुळे काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.यावेळी जिल्हाप्रमुख राजा केणी, कामगार नेते दीपक रानवडे, मानसीताई दळवी, संजीवनी नाईक, उपजिल्हाप्रमुख शैलेश चव्हाण, महिला आघाडीच्या विधानसभा अध्यक्ष तनुजा मोरे, भगीरथ पाटील, स्वप्निल पाटील, ऍड. मनमित पाटील, यश पाटील तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, आमदार महेंद्र दळवी यांच्याविरोधात खोटी व अवमानकारक विधाने करणाऱ्यांवर तातडीने कायदेशीर कारवाई झाली नाही, तर शिवसेना अधिक तीव्र आंदोलन छेडेल, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके