
रत्नागिरी, 9 डिसेंबर, (हिं. स.) : नारळ या विषयावर विशेष श्रीफळ कार्यशाळा रत्नागिरीत गुरुवारी, दि. ११ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे.
रत्नागिरीतील स्वराज्य अॅग्रो अँड अलाइड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या नारळ काढणीच्या सेवेला ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
नारळ उत्पादक शेतकरी आणि तरुणांसाठी ही कार्यशाळा होणार आहे. महाराष्ट्रातील पहिले नारळावर आधारित वस्तू व खाद्यपदार्थ विक्री केंद्र सुरू करण्यात येणार आहे. ठरावीक नारळ झाडांचेच नारळ ३२ रुपये या हमीभावात विकत घेण्याची योजनाही त्यामध्ये समाविष्ट आहे. याव्यतिरिक्त कंपनी निवडक ग्राहकांना विक्री केंद्राच्या नफ्यात भागीदारी देणार आहे. तरुणांना स्वयंरोजगार मिळण्याची संधी उपलब्ध करून देणार आहे. नारळ बागायतदारांच्या फायद्याच्या नारळ विकास बोर्डाच्या योजनांची माहिती कृषी विभागामार्फत दिली जाणार आहे. याविषयीची सत्रे कार्यशाळेत होणार आहेत.
कार्यशाळेच्या उद्घाटनाला कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर, भाट्ये येथील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. किरण मालशे आणि रत्नागिरी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले उपस्थित राहणार आहेत.
कार्यशाळेकरिता नोंदणी आवश्यक आहे. त्याकरिता 9607192912 किंवा 7507123195 या क्रमांकांवर तसेच अधिक माहितीसाठी तुषार आग्रे (9130092501) यांच्याशी संपर्क साधावा किंवा स्वराज्य अॅग्रो अँड अलाइड सर्व्हिसेस प्रा. लि., मनीषा टायपिंग सेन्टरजवळ, खालची आळी, रत्नागिरी येथे नोंदणीसाठी भेट द्यावी.
श्रीफळ कार्यशाळा जयस्तंभ येथील महिला मंडळ सांस्कृतिक सभागृहात दुपारी ३ वाजता सुरू होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी