
सोलापूर, 9 डिसेंबर (हिं.स.)। सोलापूर शहरात पोलिसांचे कमी असलेले मनुष्यबळ आणि नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे शहरात दोन दिवसाला तीन चोरीचे गुन्हे दाखल होत आहेत. दरम्यान, या वर्षात दाखल चोरीच्या एकूण गुन्ह्यांपैकी १५० गुन्ह्यांचा तपास अजूनही लागलेला नाही.
सोलापूरला आता रस्त्यांची, रेल्वेची कनेक्टिव्हिटी वाढली आहे. त्यामुळे परजिल्ह्यातील, परराज्यातील चोरटे एसटी बस, रेल्वे किंवा खासगी वाहनाने चोरीसाठी सोलापुरात येतात आणि चोरी करून जातात, अशीही उदाहरणे अनेकदा समोर आली आहेत. प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्या घरात चोरी करणारा चोरटा तर विमानाने बिहारवरून सोलापुरात आला होता. दुसरीकडे सोलापूर शहरात देखील सराईत चोरटे आहेतच.
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घरासमोर सीसीटीव्ही कॅमेरे लावणे, अपार्टमेंटमध्ये सुरक्षारक्षक ठेवणे आवश्यक आहे. प्रत्येकांनी घराला लोखंडी सेफ्टी दरवाजा बसवायला हवा, असे पोलिसांचे आवाहन आहे. तसेच शहरातून दुचाकी चोरी होण्याचे प्रमाण सरासरी दररोज एक, असेच आहे. या पार्श्वभूमीवर दुचाकीस्वारांनी कोठेही दुचाकी पार्किंग करू नये. दुचाकीला हॅण्डल लॉकशिवाय टायर तथा चाकाला स्वतंत्र लॉक लावल्यास दुचाकी चोरी थांबतील, असाही विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड