
नवी दिल्ली , 9 डिसेंबर (हिं.स.)।काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचा आज, 9 डिसेंबर रोजी 79वा वाढदिवस आहे. यानिमित्त त्यांनी देशासाठी एक संक्षिप्त पण प्रभावी संदेश दिला. पत्रकारांनी त्यांना विचारले की त्या देशाला काही सांगू इच्छितात का, तेव्हा या प्रसंगी सोनिया गांधी यांनी हसतमुखाने देशाला एक खास संदेश देत “वंदे मातरम्” असे म्हटले.
त्यांचे हे छोटेसे उत्तर लगेचच चर्चेचा विषय बनले, कारण सध्या संसदेत वंदेमातरमवरून राजकीय वाद तीव्र झाला आहे. राष्ट्रीय गीतावरील चर्चेच्या पार्श्वभूमीवर त्यांचे हे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा सत्तापक्ष आणि विरोधक आमने-सामने आहेत.दरम्यान, संसद परिसरात काँग्रेस संसदीय दलाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या प्रसंगी इंडिया गठबंधनातील अनेक नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांचे अभिनंदन केले. नेत्यांनी त्यांच्या निरोगी आणि दीर्घायुषी जीवनासाठी प्रार्थना केली. यावेळी अखिलेश यादव, प्रियंका गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खडगे यांसह अनेक नेते उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode