
नांदेड, 9 डिसेंबर (हिं.स.)।
दारूच्या नशेत विद्यार्थ्यांसमोर डान्स करणाऱ्या एका शिक्षकाला निलंबित करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
माहूर तालुक्यातील शेकापूर येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक अनंत वर्मा यांनी दारूच्या नशेत विद्यार्थ्यांसमोर नृत्य केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी वर्मा यांना निलंबित करण्यात आले आहे.
वर्मा यांचा मद्यधुंद अवस्थेतील व्हिडिओ समोर आला. विद्यार्थ्यांसमोरच त्यांनी डान्स केला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे विद्यार्थी घाबरले, काही वर्गाबाहेर पळाले. एका पालकाने हा
प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला होता. याप्रकरणी माहूरचे गटशिक्षणाधिकारी यांनी अहवाल शिक्षण विभागाकडे सादर केला. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी कावली यांनी वर्मा यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. त्यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (वर्तणूक) नियमांचे उल्लंघन केल्याचे आदेशात नमूद आहे. निलंबन काळात त्यांचे मुख्यालय शिक्षण विभाग (प्राथमिक) जिल्हा परिषद नांदेड येथे राहील. या काळात त्यांना अर्धवेतन भत्ता मिळेल. कोणताही खाजगी व्यवसाय करता येणार नाही. तसे निदर्शनास आल्यास वेगळी शिस्तभंगाची कारवाई होईल, असेही आदेशात स्पष्टपणे म्हटले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis