केंद्रीय मंत्री व्ही.सोमन्ना यांनी तिरुपती-साईनगर शिर्डी एक्सप्रेसला दाखवला हिरवा झेंडा
नवी दिल्ली, 9 डिसेंबर (हिं.स.)। केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमन्ना यांनी नवी दिल्लीतील रेल भवन येथून दूरदृश्यप्रणाली द्वारे तिरुपती-साईनगर शिर्डी एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. तिरुपती-साईनगर शिर्डी एक्स्प्रेसचा प्रारंभ आंध्र प्रदेश, तेलंग
Union Minister V. Somanna


नवी दिल्ली, 9 डिसेंबर (हिं.स.)। केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमन्ना यांनी नवी दिल्लीतील रेल भवन येथून दूरदृश्यप्रणाली द्वारे तिरुपती-साईनगर शिर्डी एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला.

तिरुपती-साईनगर शिर्डी एक्स्प्रेसचा प्रारंभ आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्र या चार राज्यांमधील रेल्वे दळणवळण लक्षणीयरीत्या सुधारणार असून, यामुळे अनेक दूरगामी फायदे होणार आहेत. तसेच यामुळे आंध्र प्रदेशच्या दक्षिण किनारपट्टी भागापासून भाविकांना शिर्डीला घेऊन जाणारी पहिली थेट रेल्वे सेवा उपलब्ध झाली आहे. तिरुपती आणि शिर्डी या भारतातील दोन प्रमुख तीर्थक्षेत्रांना थेट जोडणाऱ्या या सेवेमुळे यात्रेकरूंची अधिक चांगली सोय होणार आहे.

नवीन रेल्वेगाडीमुळे तीर्थक्षेत्र पर्यटनाला चालना मिळेल, रेल्वे मार्गालगतच्या आर्थिक गतिविधींना चालना मिळेल आणि प्रादेशिक विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे. याव्यतिरिक्त, ही गाडी प्रवाशांना सुरक्षित, आरामदायक आणि त्रासमुक्त आंतरराज्य प्रवासाचा पर्याय प्रदान करेल, आणि त्यामुळे यात्रेकरूंना रेल्वे प्रवासाचा अधिक चांगला अनुभव मिळेल. या नव्या साप्ताहिक रेल्वेगाडीने तिरुपती आणि शिर्डीदरम्यान एका दिशेचा प्रवास सुमारे 30 तास आहे.

तिरुपती-साईनगर शिर्डी एक्स्प्रेसचा शुभारंभ हा चार राज्यांमधल्या भाविकांसाठी ऐतिहासिक दिवस असल्याचे व्ही. सोमन्ना यांनी सांगितले. ते म्हणाले की, भारतीय रेल्वे केवळ वाहतुकीचे माध्यम म्हणून काम करत नाही, तर विविध प्रदेश आणि संस्कृतींनाही जोडते, आणि देशाची जीवनरेखा म्हणून महत्वाची भूमिका बजावते.

तिरुपती आणि शिर्डी ही तीर्थक्षेत्र आता थेट रेल्वेने जोडली गेली असून, या मार्गावर नेल्लोर, गुंटूर, सिकंदराबाद, बिदर, मनमाड, यासह इतर महत्त्वाच्या ठिकाणी 31 थांबे आहेत, अशी माहिती व्ही. सोमन्ना यांनी यावेळी दिली. या सेवेमुळे तीर्थक्षेत्र पर्यटन, कनेक्टिव्हिटी तसेच या मार्गालगत आणि आसपासच्या परिसरातल्या आर्थिक गतिविधींना चालना मिळेल, असे ते म्हणाले. या नवीन रेल्वेगाडीमुळे महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक आणि सिकंदराबाद या परिसरांना थेट कनेक्टिव्हिटी मिळेल, तसेच यामुळे परळी वैजनाथ हे शिवभक्तांसाठी महत्वाचं असलेले तीर्थक्षेत्रदेखील जोडले जाईल, असे ते म्हणाले. भारतीय रेल्वेने तिरुपतीमध्ये तिरुपती अमृत स्थानकासह 312 कोटी रुपये खर्चाचे प्रकल्प हाती घेतले आहेत, अशी माहिती व्ही.सोमन्ना यांनी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande