
नागपूर, 9 डिसेंबर (हिं.स.)। ज्येष्ठ समाजसेवक, कष्टकरी चळवळीचे शिल्पकार आणि सामाजिक समतेचे अग्रणी बाबा आढाव यांच्या जाण्याने कामगार, हमाल, रिक्षाचालक, मजूर आणि असंघटित क्षेत्रातील श्रमिकांच्या संघर्षाला दिशा देणारे एक प्रेरणास्थान हरपले आहे, अशा शब्दात कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी बाबा आढाव यांना श्रद्धांजली अर्पण केली.
कामगार मंत्री फुंडकर आपल्या शोकसंदेशात म्हणतात, बाबा आढाव आपले संपूर्ण आयुष्य वंचित आणि श्रमिक घटकांना न्याय, हक्क, सामाजिक सुरक्षा आणि सन्मान मिळवून देण्यासाठी जगले. हमाल, रिक्षाचालक आणि मजुरांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. ‘हमाल पंचायती’ची स्थापना हा त्यांच्या कार्याचा ऐतिहासिक टप्पा ठरला. या उपक्रमातून त्यांनी पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील हजारो हमालांना संघटित करून श्रमिक चळवळीला नवी दिशा दिली. कामगारांच्या सन्मानासाठी त्यांनी घेतलेल्या संघर्षाची परंपरा पुढील पिढ्यांना सदैव मार्गदर्शक ठरणार आहे.
समाजातील जातीय विषमतेविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी पुढाकाराने उभारलेली ‘एक गाव, एक पाणवठा’ चळवळ ही समानतेच्या लढ्यातील क्रांतिकारी पाऊल होते. सामाजिक न्याय, बंधुता आणि मानवी मूल्ये जपण्याची त्यांनी दाखवलेली जिद्द आणि कार्य समाजासाठी दीपस्तंभासारखे आहे. बाबा आढाव यांचे निधन म्हणजे श्रमिक चळवळ, सामाजिक न्याय आणि मानवी हक्कांच्या लढ्यातील एक मोठी पोकळी आहे. त्यांच्या कार्यातून आणि विचारांतून प्रेरणा घेऊन आपण सर्वांनी समाजहिताच्या कामात योगदान देणे हीच त्यांच्या स्मृतीला खरी आदरांजली ठरेल, असेही कामगार मंत्री यांनी आपल्या शोकसदेशात म्हटले आहे.
बाबा आढाव यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करून कुटुंबीयांच्या दुःखामध्ये सहभागी असल्याची भावना ही कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी व्यक्त केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर