
नागपूर, 9 डिसेंबर (हिं.स.)। : सातारा जिल्ह्यातील फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या ही दुर्दैवी घटना आहे .या प्रकरणी चौकशीसाठी निवृत्त न्यायाधिशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. राज्यातील महिलांच्या सुरक्षेसाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.
सदस्य अमित साटम यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी ज्या-ज्या संबंधितांची नावे समोर आली त्यांची चौकशी करण्यात आली आहे. महिलेच्या सुसाईड नोटचे अक्षर हे त्या महिलेचे असल्याचे समोर आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी संबंधित महिला डॉक्टरचे शोषण व फसवणूक केल्याचे तपासात समोर आले आहे. या विषयी गुन्हा दाखल झाला असून गुन्हेगारांना अनफिट प्रमाणपत्र दिल्याचे प्रकरण होते. हे प्रकरण पाच महिन्यापूर्वीचे असून आत्महत्येविषयी आरोपींनी केलेली फसवणूक हे महत्वाचे कारण समोर आले आहे. तसेच आत्महत्येपूर्वी महिलेला भेटण्यास कोण कोण आले याचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
कोरेगाव पार्क, पुणे येथील विद्यार्थिनी आत्महत्या प्रकरणी ही सखोल चौकशी करण्यात येईल. केंद्र सरकारच्या नवीन तीन कायद्यामध्ये शक्ती कायद्यातील अनेक तरतुदींचा समावेश आहे. काही तरतुदी सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन करतात. या सर्व गोष्टीचा अभ्यास करून ज्या तरतुदी करावयाच्या आहेत या विषयी काम सुरू असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
राज्यात संजय गांधी निराधार योजनेचा निधी रोखला नाही. या योजनेचा निधी डीबीटीद्वारे देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
या वेळी सदस्य विजय वडेट्टीवार, प्रकाश सोळंके, ज्योती गायकवाड, सुनील प्रभु, नाना पटोले यांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर