
नागपूर, 9 डिसेंबर (हिं.स.)। भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाची रचना केली. या संविधानात नागरिकांच्या आशा, आकांक्षा, अपेक्षा पूर्ण करता येईल, अशी व्यवस्था केली. अनेक आव्हानांचा सामना करत आपली लोकशाही, संविधानिक संस्था प्रगल्भ झाल्या. संसदीय लोकशाहीची अतिशय सुंदर अशी रचना देखील संविधानाने केली आहे. संसदीय अभ्यासवर्गातून लोकशाहीची प्रक्रिया समजून घेण्याची संधी मिळते, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
विधानभवन येथे ५१ व्या संसदीय अभ्यासवर्गाचे मुख्यमंत्र्यांच्याहस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानपरिषदेच्या उपसभापती डॅा.नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा राष्ट्रकुल संसदीय मंडळाचे कोषाध्यक्ष ॲड.आशिष शेलार, विधानमंडळ सचिव मेघना तळेकर आदी उपस्थित होते.
संसदीय अभ्यासवर्ग लोकशाहीची ओळख करून देणारा वर्ग आहे. पुस्तकी अभ्यासक्रमांमध्ये आपण लोकशाहीची मूल्ये, प्रक्रिया वाचतो. अभ्यासवर्गात मात्र ही प्रक्रिया जवळून बघता येते. राज्याचा कारभार कसा चालला पाहिजे याचा नियम संविधानाने दिला. विधानसभा आणि विधानपरिषद या दोनही सभागृहाचे नियम, त्यातील एक एक शब्द, तरतूद संविधानाच्या आधारावरच झाली आहे. विधानमंडळाच्या कामकाजाची सुंदर रचना संविधानाने दिली, असे मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.
विधानमंडळात वेगवेगळ्या प्रकारचे कायदे केले जातात. हे कायदे लोकांच्या आशा, अपेक्षा पूर्ण करणारे असतात. कायदे तयार होत असतांना सभागृहात होत असलेली चर्चा गुणात्मक असते. राज्यातील शेवटच्या माणसावर एखाद्या कायद्याचा काय परिणाम होईल, याची बाजू देखील सभागृहात मांडली जाते. विधानमंडळाच्या मंजुरीशिवाय राज्याच्या तिजोरीतील एक रुपया देखील खर्च होऊ शकत नाही. विभागांना आपल्या मागण्या सभागृहासमोर ठेवाव्या लागतात. त्यावर चर्चा होते, मान्यतेनंतर अर्थसंकल्प तयार होतो आणि त्यानंतर कायदा तयार करावा लागतो. हा कायदा म्हणजे राज्याच्या तिजोरीची चावी आहे, असे श्री.फडणवीस यावेळी म्हणाले.
राज्यातील एखाद्या छोट्या घटनेचे पडसाद देखील विधिमंडळात उमटत असतात. लोकशाहीची प्रक्रिया विधिमंडळाच्या कामामुळे जीवंत राहते. सभागृहातील सभापती, अध्यक्ष आमचे हेडमास्टर आहेत, त्यांच्या मंजुरीशिवाय सभागृहात कोणतीही गोष्ट होऊ शकत नाही. संसदीय लोकशाहीत विविध प्रकारची आयुधे आहेत. ही आयुधे लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी महत्त्वाची साधने आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
विधानमंडळाच्या माध्यमातून लोकशाहीचे प्रतिबिंब
-सभापती प्रा.राम शिंदे
भारतीय प्रजासत्ताकाला ७५ वर्ष पूर्ण होत असतांना ५१ वा संसदीय अभ्यासवर्ग सुरु होत आहे. आपल्या देशात संसदीय लोकशाहीला अनन्यसाधारण महत्व आहे. विधानमंडळाच्या माध्यमातून लोकशाहीचे प्रतिबिंब उमटत असते. विधानमंडळ सभागृहाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना योजना आणि राज्याला प्रगतीची दिशा देण्याचे काम होते. अभ्यासवर्गातून लोकशाहीशी संबंधित देवाणघेवाण तसेच प्रबोधन, शिक्षण, संवाद आणि सातत्य शिकता येईल, असे सभापती प्रा.राम शिंदे यांनी सांगितले.
संसदीय अभ्यासवर्ग लोकशाही बळकट करण्याचा उपक्रम
-अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर
राष्ट्रकुल संसदीय मंडळाचा अभ्यासवर्ग हा सर्वांत जुना आणि महत्वपूर्ण तसेच संसदीय लोकशाही बळकट करण्याच्या प्रयत्नातील एक उपक्रम आहे. संसदीय लोकशाही पद्धत अधिक बळकट करायची असेल तर त्याची माहिती जनमानसापर्यंत पोहोचली पाहिजे. अभ्यासवर्गातून सभागृहाचे कामकाज तसेच संविधानातील तरतुदींचे पालन कसे होते याची माहिती मिळेल, असे विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी सांगितले.
संसदीय अभ्यासवर्ग सर्वांना उपयुक्त
-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
भारतीय लोकशाही देशाची खरी ताकद आहे. विविध जाती धर्माचे नागरिक देशात एकत्र नांदतात, ही आपल्या लोकशाहीची किमया आहे. राज्यघटनेने दिलेली संसदीय लोकशाही देशाच्या धोरणांना दिशा देण्याचे काम करते. भारतीय राज्यघटना सर्वोत्तम घटना आहे. त्या आधारेच देश चालतो, लोकशाही कर्तव्याची जाणीव घटना करून देते. संसदीय अभ्यासवर्गातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्षपणे या सर्व गोष्टी अनुभवायला मिळणार आहे. संसदीय अभ्यासवर्ग केवळ विद्यार्थीच नाही तर लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांसाठी देखील उपयुक्त आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर