
इस्लामाबाद , 9 डिसेंबर (हिं.स.)।पाकिस्तानचे संरक्षण दल प्रमुख (सीडीएफ) फील्ड मार्शल आसिम मुनीर यांनी सोमवारी म्हटले की पाकिस्तान हा शांतताप्रिय देश आहे आणि त्याच्या सार्वभौमत्वाची व प्रादेशिक अखंडतेची परीक्षा कोणालाही घेऊ दिली जाणार नाही. त्यांचा इशारा भारतीय नेत्यांच्या कठोर वक्तव्यांकडे आणि अफगाणिस्तानाशी सुरू असलेल्या तणावामुळे निर्माण झालेल्या चकमकींकडे होता.
सीडीएफ झाल्यानंतर प्रथमच लष्करी अधिकाऱ्यांना संबोधित करताना आसिम मुनीर म्हणाले की भारताने भ्रम बाळगू नये. कोणतीही आक्रमक कारवाई झाल्यास त्याला गंभीर आणि तात्काळ प्रत्युत्तर दिले जाईल. पुढे मुनीर म्हणाले की अफगाण तालिबानला स्पष्ट संदेश देण्यात आला आहे. त्यांच्याकडे फक्त एकच पर्याय आहे—त्यांनी पाकिस्तान आणि फितना अल-ख्वारिजी (टीटीपी) यांपैकी एकाची निवड करावी लागेल.
मुनीर म्हणाले की नुकतेच स्थापन झालेले संरक्षण दल मुख्यालय हा मूलभूत बदलांचा, ऐतिहासिक स्वरूपाच्या परिवर्तनाचा प्रतीक आहे. त्यांनी हेही स्पष्ट केले की प्रत्येक दल आपली कार्यात्मक तयारी राखण्यासाठी स्वतःची वैशिष्ट्ये कायम ठेवेल, आणि सीडीएफ मुख्यालय या दलांच्या कार्यांचे समन्वयन करेल.
फील्ड मार्शल मुनीर यांनी पहिल्यांदाच सीडीएफ म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. सरकारने त्यांच्या या नवीन भूमिकेसाठी पाच वर्षांच्या कार्यकाळासंबंधीची अधिसूचना गेल्या आठवड्यात जारी केली. यासोबतच ते सेना प्रमुख म्हणूनही कार्यरत राहतील.सीडीएफची स्थापना गेल्या महिन्यात 27व्या घटनादुरुस्तीनंतर आणि त्यानंतर पाकिस्तान लष्कर, वायुसेना आणि नौदल (दुरुस्ती) विधेयक 2025 मध्ये करण्यात आलेल्या बदलांनंतर करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode