
धुळे , 9 डिसेंबर (हिं.स.)साक्री तालुक्यातील गणेशपूर येथे रविवारी मोठी दुर्घटना घडली. कांदे भरलेला ट्रॅक्टर ट्रॉलीसह नियंत्रण सुटून सुमारे ६० फूट खोल विहिरीत कोसळला. ट्रॅक्टरवर खेळत बसलेल्या तीन चिमुकल्यांपैकी एकीला ग्रामस्थांनी वेळेत बाहेर काढून प्राण वाचवले, मात्र दोन बालिकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली. या घटनेत खुशी दाजू ठाकरे (वय ३ वर्ष) ऋतिका संदीप गायकवाड (वय ३ वर्ष) यांचा बुडून मृत्यू झाला.
गणेशपूर येथील माजी पोलिस पाटील प्रकाश मराठे यांच्या शेजारच्या शेतात रविवारी ट्रॉलीमध्ये चाळीतील कांदा भरण्याचे काम सुरू होते. कामगारांच्या तीन मुली ट्रॅक्टरवर बसून खेळत असताना अचानक शेतातील उतरतीला लागलेला ट्रॅक्टर घसरला आणि विहिरीत कोसळला. विहीर पूर्णपणे पाण्याने भरलेली होती.घटना समजताच आसपासच्या शेतांतील कामगार आणि ग्रामस्थांनी तातडीने विहिरीकडे धाव घेत बचावकार्य सुरू केले. प्रयत्नांमुळे परी संदीप गायकवाड (वय २ वर्ष) ही बालिका सुखरूप बाहेर काढण्यात आली. मात्र, इतर दोन बालिकांचा शोध काही केल्या लागत नव्हता. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या शोधमोहीमेनंतर खुशी दाजू ठाकरे हिचा मृतदेह सापडला. तिसऱ्या बालिकेचा शोध न लागल्याने सोमवारी पुन्हा शोधमोहीम सुरू ठेवण्यात आली. अखेर ऋतिका संदीप गायकवाड हिचाही मृतदेह मिळाला.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर