प्रभाकर साईलचे आरोप ग्राह्य न धरण्याची समीर वानखेडेंची याचिका फेटाळली
साक्षीदाराविरोधात निर्णय देण्याचे अधिकार नाही - सत्र न्यायालय मुंबई, २५ ऑक्टोबर (हिं.स.) : आर्यन खा
प्रभाकर साईलचे आरोप ग्राह्य न धरण्याची समीर वानखेडेंची याचिका फेटाळली


साक्षीदाराविरोधात निर्णय देण्याचे अधिकार नाही - सत्र न्यायालय

मुंबई, २५ ऑक्टोबर (हिं.स.) : आर्यन खान प्रकरणातील महत्वाचा साक्षीदार प्रभाकर साईल याने केलेले आरोप ग्राह्य धरू नये, यासाठी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. सदर प्रकरण उच्च न्यायालयात असल्यामुळे सुनावणीला सत्र न्यायालयाने नकार दिला आहे. तसेच यावर न्यायालयाने साक्षीदाराविरोधात निर्णय देण्याचे आपल्या अधिकारात येत नसल्याचे उत्तर दिले आहे.

प्रभाकर साईल याने नुकताच क्रूझ पार्टीवरील कारवाईवेळी आपण किरण गोसावीसोबत उपस्थित होतो आणि प्रकरणाचा साक्षीदार म्हणून माझ्याकडून कोऱ्या कागदावर सह्या घेण्यात आल्याचा खळबळजनक दावा केला. त्यामुळे एनसीबीसह वानखेडे अडचणीत आले आहेत. तसेच समीर वानखेडेंना २५ कोटींपैकी ८ कोटी रुपये दिले जाणार होते. सॅम नावाच्या व्यक्तीशी गोसावीची भेटही झाली होती. ते एका निळ्या कारकडे गेले, त्या कारमध्ये शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी देखील होती, असा दावा प्रभाकरने केला आहे. या संदर्भातील प्रतिज्ञापत्र त्याने न्यायालयात दाखल केले आहे.

या पार्श्वभूमीवर साक्षीदाराने केलेल्या आरोपावर वानखेडे यांनी सोमवारी सकाळी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. त्याठिकाणी वानखेडे यांनी प्रभाकर साईलने न्यायालयात तक्रार का केली नाही? असे म्हटले आहे. प्रभाकरने २२ दिवसांनी हा आरोप का केला? असा प्रश्न वानखेडे यांनी प्रतिज्ञापत्र दाखल करत विचारला होता. तसेच वारंवार माझ्यावर वैयक्तिक हल्ले करण्यात येत आहेत. मला धमक्या दिल्या जात आहेत. माझ्यावर राजकीय पक्षाचा दबाव आहे. माझ्यावर चुकीचे आरोप करून बदनामी केली जात आहे. ज्या महिलेसोबत माझा घटस्फोट झाला आहे तिच्यासोबतचा फोटो कुणाच्या परवानगीने व्हायरल करण्यात आले? एका घटस्फोटित महिलेलाही सोडले गेले नाही. इतक्या खालच्या पातळीवर आरोप होत आहेत, असेही वानखेडे यांनी म्हटले आहे.

यावर सत्र न्यायालयाने आर्यनच्या जामिनावरील याचिका आता उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. यामुळे या प्रकरणी आम्ही कोणताही आदेश जारी करू शकत नाही. आता हे प्रकरण आमच्या अधिकारात येत नसल्याने कोणतीही कारवाई करू शकत नाही, असे सत्र न्यायालयाने स्पष्ट केले.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande