उत्तर भारतात यंदा कडाक्याची थंडी
नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर (हिं.स.) : उत्तर भारतात यंदा कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हव
संग्रहित


नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर (हिं.स.) : उत्तर भारतात यंदा कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. आगामी जानेवारी-फेब्रुवारीत देशाच्या उत्तर भागात सर्वसाधारणतः पारा 3 अंश सेल्सिअसच्या आसपास जाण्याची भीती हवामान विभागाच्या अंदाजात नमूद करण्यात आलीय.

प्रशांत महासागराच्या परिसरात ‘ला नीना‘ हा घटक पुन्हा डोके वर काढत आहे. ‘ब्लूमबर्ग’च्या हवामान अंदाजानुसार याचा फटका उत्तरपूर्व आशियातील बहुतांश देशांना बसेल. आर्कटिक क्षेत्रातील कारा समुद्रात बर्फाचे प्रमाण घटल्याने वायव्य आशियात कडाक्याची थंडी पडू शकते. मागील वर्षी काही दिवस हीच परिस्थिती उद्भवली होती. मात्र यंदा जानेवारी व फेब्रुवारी अशा दोन महिन्यांसाठी हा इशारा देण्यात आला आहे. ला निनाच्या परिणामस्वरूप उत्तर भारतातही जानेवारीपासून तापमान 3 अंश सेल्सिअस व त्यापेक्षाही कमी होण्याची शक्यता आहे. प्रशांत महासागरात ‘ला नीना’ चे अस्तित्व जाणवणे म्हणजे पृथ्वीच्या उत्तर गोलार्धातील तापमानात एका झटक्यात होणारी मोठी घसरण मानली जाते. दिल्लीत मागील आठवड्यात पाऊस झाल्यानंतर वातावरणातील गारठा वाढू लागला आहे.

या थंडीचा भारतापुरता साईड इफेक्ट म्हणजे एक गंभीर वीजसंकट पुन्हा डोके वर काढेल अशीही भीती व्यक्त होत आहे. देशात अलीकडेच कोळसा खाणींच्या क्षेत्रातील पुरामुळे वीजसंकट निर्मण होण्याची भीती निर्माण झाली होती. केंद्राने धावपळ करून परिस्थिती हाताबाहेर जाण्यापासून तूर्त रोखली मात्र वीजसंकट कायम आहे. अशात तापमानाचा पारा 3 अंश किंवा त्यापेक्षा खाली राहणार असेल तर देशाला पुन्हा वीजटंचाईच्या संकटाचा सामना करावा लागेल अशी शक्यता व्यक्त होत आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande