कुठे गेली शिवशाही, ही तर निजामशाही!
स्त्री... आई, बहिण, लेक, सखी, पत्नी अशा कित्येक नात्यांतून आपणा सर्वांना परिचित आहेच. तिच्या अनेक शक
कुठे गेली शिवशाही, ही तर निजामशाही!


स्त्री... आई, बहिण, लेक, सखी, पत्नी अशा कित्येक नात्यांतून आपणा सर्वांना परिचित आहेच. तिच्या अनेक शक्ति रूपांना देखील हा समाज पूजतो. प्राचीन काळापासून तर स्त्रियांना नारायणीचा दर्जा प्राप्त आहे.

पण काळाच्या ओघात स्त्रियांच्या सन्मानाच्या दर्जात आणि त्यांच्याशी संबंधित परिस्थितींमध्ये बरेच बदल झाले. हा बदल सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही आहे.

खरेतर आदराची स्थिती सर्वत्र सारखी नसते. आणि महिलांच्या प्रगतीचा आलेखही त्या अनुषंगाने प्रत्येक समाजात सारखा नसतो. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, मी एखाद्या समाजाची प्रगती त्या समाजातील महिलांनी केलेल्या प्रगतीवरून मोजतो. जर खरोखरच समाज जीवनाचा मूळ आधार त्या समाजातील स्त्रिया असतील तर महाराष्ट्रातील सध्य परिस्थिती पाहता स्त्रियांच्या बाबतीत त्यांची सुरक्षा, प्रगती आणि त्यांचा आदर- सन्मान ह्या सार्याच गोष्टी ऐरणीवर असल्याचं चित्र दिसतंय...

अलीकडे, महिला अत्याचाराच्या घटनांनी राज्यात थैमान घातलंय... हल्ली असा एकही दिवस नसतो, की राज्याच्या कुठल्याही कोपऱ्यातून महिला अत्याचाराच्या घटनांची बातमी येत नाही... प्रत्येकच दिवस वर्तमानपत्रातून, टीव्ही चॅनलवरून, सोशल मीडियावरुन एक ना एक महिला अत्याचाराची घटना वाचायला-ऐकायला मिळतेच. इतकंच नव्हे तर, या घटनाही एकापेक्षा एक... दिवसेंदिवस क्रूरपणाचीही सीमा ओलांडून पाशवी बनत चाललेल्या... बलात्कार, सामूहिक बलात्काराच्या घटनांचं सत्र तर असं वाढत चाललंय जणू गल्लोगल्ली सोनसाखळी चोरीच्या घटना घडाव्यात...

ना चिमुकल्या जीवांच्या कोवळेपणाचं भान ना वयोवृद्धांच्या वयस्कपणाचं !

६-८ वर्षांच्या लहानगींवर ज्या अमानुषपणे बलात्कार होतात, ते ऐकून अक्षरशः मन हादरतं... त्या निरागस मुलींमध्ये असं कोणतं आकर्षण दिसतं, या नराधमांना, हे समजण्यापलीकडचं आहे. तरुणी, महिला यांच्याबाबतीत म्हटलं जातं की, त्यांचे गुडघेभर-तोकडे कपडे, चालीढालींमुळे पुरुषांची कामवासना भडकते... आणि शेवटी पुरुष कामातूर होऊन बलात्कार करतात.. हा तर्क त्या चिमुकल्या जीवांच्या बाबतीत तर लागू होत नाही ना... मग...? पुरुषप्रधान संस्कृतीचा टेमका मिरवणारी काही डोकी पुरुषांच्या गैरवर्तणुकीचं असं समर्थन करतात, तेव्हा त्यांची कीवच येते. मात्र असं समर्थन जेव्हा सत्ताधाऱ्यांकडून केलं जातं, तेव्हा चीड येते... कोणत्या समाजात राहतोय आपण?

संजय राठोड, निलेश लंके, महेबूब शेख… ही सत्ताधा-यांच्या काळ्या कृत्याची रांग आहे. अजूनही सत्ताधा-यांचं संरक्षण आरोपींना लाभलंय. हेच आहे का सरकारचं महिला धोरण ? अशा पुढा-यांचा बचाव केला जात असल्यामुळे गुन्हेगारीला बळ मिळतंय. आम्ही आवाज उठवला तर आवाज दाबण्याचा प्रयत्न केला गेला.

शारीरसौख्यासाठी हपापलेली ही अमानवीय वृत्ती कोणत्याही सभ्य समाजासाठी एक कलंकच आहे. राज्यातील सध्य परिस्थिती पाहता, वाटते... हे जंगलराजच आहे, जंगलराज!! मानवी कातडं पांघरून जनावरांप्रमाणे महिलांच्या शरीराचे लचके तोडणारं, जंगलराज!!!

खरंतर, हे जंगलराज बनलंय सत्तालोलुप तीन पक्षांच्या एकमेकांकडे बोट दाखविण्याच्या नाकर्त्या धोरणांमुळेच... मुळात, हे महाविकास आघाडीचं सरकार आलं तेच एक तडजोड म्हणून. ओढून-ताणून बनलेल्या या जुगाड सरकारला आता दोन वर्षं पूर्ण होताहेत... पण या दोन वर्षांमध्ये महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्थेला मात्र चांगलाच तडा गेलेला आपण बघतोय.

तुम्ही ज्या खुर्चीवर बसला आहात, त्या खुर्चीची आब तर राखता आलेली नाहीच, मात्र राज्यात महिलांची अब्रूही सुरक्षित ठेवता येत नसेल तर आता या सरकारनं स्वतःचं नाकर्तेपण तरी स्वीकारावं..

मुख्य प्रश्न असा आहे की, महिलांना सन्मानपूर्वक वागणूक कशी मिळेल... शिवाय त्यांना सुरक्षित कसं केलं जाईल.

शहरी भागांत उच्चशिक्षितांकडून महिलांची छळवणूक होतेच पण दुर्गम भागांत सरकारी अधिकारी आणि पोलिस यंत्रणाकडून महिलांचा छळ कमी होताना दिसत नाही. आत्ता दोन ताज्या घटना घडल्या… वसई मध्ये चोरीच्या संशयावरून ६ आदिवासी महिलांची बेदम मारहाण पोलिसांनी केली… तर वन अधिका-याने दलित आणि आदिवासी महिलांना चटके दिले. हेच आहे या सरकारचं महिला धोरण. लोकशाहीला बसलेले हे चटके आहेत. दलित आणि आदिवासी महिलांचा अजूनही कोणी वाली नाही. त्यांचा आवाज मातोश्रीच्या भिंतीपर्यंत पोहोचत नाही. कारण मध्येच महिलांना रोखण्यासाठी मोठमोठाले कंपाऊंड बांधले आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना तिन्ही पक्षांनी फायद्याचा विचार केला. आपआपली विचारसरणी गुंडाळून मलई खाण्यासाठी एकत्र आले. सोयीस्कर ठराविक मुद्द्यांवर संमती झाली पण तिघांच्याही कॅामन मिनिमम प्रोग्राम मध्ये महिला सुरक्षा मुद्दा येत नाही का ? फुलेंच्या नावानं राजकारण केलं जातंय पण त्या सावित्री माईंच्या लेकींना सुरक्षित वातावरण देण्यात सरकार अपयशी ठरलंय.

इंग्रजांच्या जुलमी राजवटीची पुनरावृत्ती होतेय. गोरे गेले आणि काळे आले एवढंच काय तो फरक. पण महिलांवरील अत्याचार कमी झाले नाहीत. काल परवा बातमी वाचली तालिबान मध्ये चॅनेलवरील महिला ॲंकरनं चेहरा दाखवायचा नाही आणि बुरखा घालूनच बातम्या द्यायच्या. पुरोगामी महाराष्ट्रात हा दिवस उजाडायला वेळ लागणार नाही. दोन वर्षापासून सरकारचं अस्तित्वच दिसत नाही. गाढ कुंभकर्ण झोपेत गेलेल्या सरकारला दंडुके मारून जागे करण्याची वेळ आलीय. तिघांचे सरकार स्थापन झाल्यावर शिवशाही येणार असल्याचा गाजावाजा केला. शिवशाही तर आलीच नाही पण निजामशाही आणल्याचं पाप सरकारच्या माथ्यावर आहे.

चित्रा किशोर वाघ, प्रदेश उपाध्यक्ष, भाजप

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande